वाटप केलेली रोपे विद्यापीठात पडून

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून एकाच प्रकारच्या रोपांच्या वाटपाचा विश्वविक्रम नोंदवल्यानंतर याच कार्यक्रमातील रोपे विद्यापीठात पडून असल्याचे आढळून आले आहे. विद्यापीठातील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकच्या मागे ही रोपे टाकण्यात आली असून त्यातील काही रोपे वाळूनही गेली आहेत.

विद्यापीठाने ‘स्वच्छ  वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या अभियानाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठय़ा नेत्यांच्या उपस्थितीत जूनमध्ये केला होता. वारी मार्गाच्या परिसरात आणि अन्य ठिकाणी लावण्यासाठी कडुनिंबाच्या १५ हजार रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर अनेक रोपे अस्ताव्यस्त पडली असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतरही ही रोपे लावलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोपे वितरण कार्यक्रमाचा खटाटोप हा विश्वविक्रम नोंदवण्यासाठीच करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विश्वविक्रमाच्या या कार्यक्रमासाठी ३ कोटी ४० लाख रुपये खर्च केल्याची माहिती स्टुडंट हेल्पिंग हँडच्या कुलदीप आंबेकर यांना विद्यापीठाकडूनच माहिती अधिकारात देण्यात आली होती. या खर्चातील ६९ लाख विद्यापीठाने दिले होते, तर २ कोटी ७१ लाख प्रायोजकांकडून वस्तू, जेवण अशा स्वरूपात मिळवण्यात आले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून पडून असलेली रोपे पाहता या कार्यक्रमाचा हेतू खरोखरीच सफल झाला का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी आंबेकर यांनी उच्च शिक्षण संचालकांकडे केली आहे.

उपक्रमाबाबतच प्रश्नचिन्ह

विद्यापीठात अस्ताव्यस्त पडून असलेली रोपे पाहता, एकूण उपक्रमातील रोपांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने एकूण किती रोपे आणली, त्यातील किती रोपांचे वाटप झाले, किती रोपांची लागवड  झाली, किती वाया गेली या प्रश्नांची उत्तरे विद्यापीठाने देणे गरजेचे आहे. तसेच या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

रोपे पडून असणे निश्चितच गंभीर आहे. या संदर्भात चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

– डॉ. एन. एस. उमराणी,

प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ