प्रभारी विभागीय आयुक्त म्हैसेकर यांचे आदेश

राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पुणे विभागात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिले आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन २३ जूननंतर संबंधित उत्पादकाकडून होत नसल्याबाबतची दक्षता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात पुणे विभागाच्या आयोजित बैठकीत म्हैसेकर बोलत होते. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. पी. जी. दर्शने, पुरवठा विभागाचे उप आयुक्त दीपक नलवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी सी. एम. चव्हाण यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्य़ांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्या शासनाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

म्हैसेकर म्हणाले,की प्लास्टिक व थर्माकोल उत्पादनावरील बंदीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी  जिल्हास्तर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यशाळांचे आयोजन करावे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग, गृहविभागासह विविध प्रशासकीय विभागांनी याबाबत कठोर पावले उचलावीत. विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी. पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन कामकाजाचा आढावाही या वेळी घेण्यात आला. तसेच पाचगणी व सासवडच्या मुख्याधिकाऱ्यांना उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन केल्याबद्दल गौरविण्यात आले.