अपप्रचारामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची अडवणूक

प्लास्टिकची अंडी बाजारात विक्रीस आली असून प्लास्टिकची अंडी पाण्यावर तरंगतात, असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून वेगाने समाजमाध्यमावर प्रसारित केली जात आहे. या अफवेमुळे अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिकांच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नसला तरी अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांची अडवूणक होत आहे. या पार्श्वभूमीवर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (नॅशनल एग्ज कोर्डिनेशन कमिटी) कडून करण्यात आली आहे.

प्लास्टिकची अंडी बाजारात विक्रीसाठी आल्याबाबतचा संदेश गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. या पाश्र्वभूमीवर ‘एनईसीसी’चे अध्यक्ष एम. बी. देसाई यांनी हा खुलासा आणि कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. व्ही. एच. ग्रुपचे (वेंकीज) सरव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगांवकर, महाराष्ट्र पशुवैद्यकीय मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर संचालित मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त सुरेश देशमुख, ‘एनईसीसी’चे सदस्य पी. के. भगत आदी या प्रसंगी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, समाजमाध्यमावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या अफवांमुळे अंडी विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, अंडय़ांची एकूण विक्री पाहता परिणाम तसा नगण्य आहे. समाजमाध्यमावरील अफवांमुळे सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा प्रकारची अफवा पसरवून पोल्ट्री व्यावयिकांची अडवणूक करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची अफवा ठाणे जिल्ह्य़ात पसरविण्यात आली होती. त्यावेळी अंडी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा अडवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे मदत मागितली होती. प्लास्टिकची अंडी तयार करणे शक्य नाही. ‘एफडीए’कडून अंडय़ांची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकची अंडी अफवा असल्याचे निदर्शनास आले होते, असे सुरेश देशमुख यांनी नमूद केले.

ताजे अंडे पाण्यात बुडते

ताजे अंडे पाण्यात बुडते. अंडे शिळे झाल्यानंतर ते पाण्यात टाकले असता पाण्यावर तरंगते. शिळी अंडी फोडल्यानंतर त्याचा अंतर्गत भाग प्लास्टिकप्रमाणे दिसतो. अंडय़ात मोठय़ा प्रमाणावर प्रथिने आहेत. कमी पैशात प्रथिने मिळण्यासाठी अंडय़ांचे सेवन सामान्यांकडून मोठय़ा प्रमाणावर केले जाते. कृत्रिमरीत्या अंडी तयार करणे आणि ती बाजारात विक्रीस आणणे हे परवडणारे देखील नाही. प्लास्टिकची अंडी ही निव्वळ अफवा आहे, असे डॉ. अजित रानडे यांनी सांगितले.

दररोज २४ कोटी अंडय़ांची विक्री

महाराष्ट्रात दररोज एक कोटीहून जास्त अंडय़ांची विक्री केली जाते तर देशात दररोज २४ कोटी अंडय़ांची विक्री केली जाते. कुक्कुटपालन व्यवसायावर मोठय़ा प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत. अंडय़ांवर उत्पादन दिनांक तसेच निर्मिती दिनांकाचा उल्लेख करणे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अंडी शीतकपाटात ठेवल्यानंतर जास्त काळ टिकतात. बाजारात साधारणपणे चार ते आठ दिवसात अंडी विक्रीस येतात. अनेकजण अंडी गरजेनुसार खरेदी करतात. ज्यावेळी अंडय़ांना मागणी कमी असते तेव्हा ती शीतगृहात ठेवली जातात. सापेक्ष आद्र्रता ७५ ते ८० टक्के राखली जाते.अंडय़ातील आद्र्रता कमी झाली तरी पोषणमूल्यावर परिणाम होत नाही, असे डॉ. प्रसन्न पेडगांवकर यांनी सांगितले.