ऑलिंपिक स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला मोठ्या प्रमाणावर तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा तणावातून खेळाडूला बाहेर पडण्यासाठी प्रत्यक्ष खेळ खेळलेल्या व मानसोपचार तज्ज्ञ अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची आज गरज आहे. मात्र, आपल्या देशात नेमबाजी खेळलेला मानसोपचार तज्ज्ञ नाही, अशी खंत नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राही सरनोबतशी वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ती बोलत होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थित होते.

यावेळी राही म्हणाली की, ऑलिंपिकमध्ये जाणे वेगळाच अनुभव असतो. सध्या मी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव करत आहे. यंदा या स्पर्धेत निश्चित यश मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. तसेच टोकिओ ऑलिंपिक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी १५ नोव्हेंबर २०१७ पासून तयारीला सुरूवात केली आहे. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या मी जर्मनीच्या मुंखाबायर दुर्जसरेन यांच्याकडून नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असल्याचे तिने सांगितले.
तसेच, परदेशी प्रशिक्षक घेण्याचे कारण म्हणजे यंदा मी २५ मीटर नेमबाजी प्रकारात ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. या प्रकारात सहभागी होणारी मी भारतातील पहिली महिला असून या प्रकाराची माहिती असलेला आपल्याकडे एकही प्रशिक्षक नाही. त्यामुळेच आम्हाला परदेशी प्रशिक्षकाशिवाय पर्याय नाही. मात्र, आता आम्ही त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन खेळाडूंना प्रशिक्षण देऊ शकतो किंवा आम्हालादेखील बाहेरून प्रशिक्षणासाठी बोलावतील. सध्या आपल्या देशात सोयी-सुविधा भरपूर आहेत. परंतु या सुविधा वापरणार्‍यांचा वानवा असल्याचे तिने सांगितले.