जम्मू-काश्मीरमधील आजची अस्थिर परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी वापरलेली नीती अवलंबावी अशी मागणी, पुण्यातील काश्मिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणि दहशतवाद नष्ट होण्याच्या दृष्टीने पाकिस्तान सोबत चर्चा केली पाहिजे, अशा प्रकारचा संवाद झाल्यास नक्कीच मार्ग निघेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सरहद संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर येथील काही तरुण पुण्यातील गेल्या पंधरा वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. पत्रकार परिषद घेऊन यातील काही विद्यार्थ्यांनी पुलवामातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे येत या घटनेचा निषेध नोंदवला तसेच काश्मीरमधील परिस्थितीबाबत आपल्या भावना केल्या.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असून नागरिक या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चे काढत आहे. उत्तर भारतातील काही भागात तर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. यावर भाष्य करताना हे विद्यार्थी म्हणाले, आम्ही पुण्यात सुरक्षित आहोत, पंधरा वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा जम्मू-काश्मीरची परिस्थिती भयानक होती. त्यानंतर काही काळ तिथं चांगलं वातावरण होतं. मात्र, आता पुन्हा काश्मीर अशांत झाला आहे. याचा विपरित परिणाम तरुण पिढीवर पडला असून ते शिक्षणापासून दूर गेले आहेत.

काश्मीरमध्ये पुन्हा सुरु झालेल्या दहशतवादी कारवाया ही निषेधार्ह बाब आहे. या घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जम्मू काश्मीर हे पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण मानले जात. मात्र, वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे लाखोंवर असलेली पर्यटकांची संख्या काही हजारांवर आली आहे. यामुळे येथील रोजगारावरही विपरित परिणाम झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला सरहद संस्थेचे संजय नहार, औवीस वानी, सिराज खान, झायाद भट, इकबाल भट आणि जावेद वानी आदी उपस्थित होते.