ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

पुणे : पंतप्रधान मुद्रा योजनेतून पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने एकाची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभाष शंकरलाल जैन (वय ६५,रा. गंगाधाम, मार्केटयार्ड)  यांनी यासंदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जैन यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून पन्नास लाख रुपयांचे कर्ज व्यवसायसाठी मिळवण्याबाबत ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यानंतर अज्ञाताने जैन यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाइन अर्जाबाबत त्याने जैन यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याने जैन यांना एक इमेल पाठविला. पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले.

जैन यांना अज्ञाताने सुरुवातीला काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी केली. जैन यांनी अज्ञाताने सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवळी रक्कम जमा केली. जैन यांनी एकूण मिळून ७ लाख ८१ हजार ९१३ रुपये जमा केले. मात्र फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर तपास करत आहेत.

महिलेला ८ लाखांचा गंडा

ऑनलाइन फसवणुकीचे सत्र शहरात कायम आहे. विश्रांतवाडी भागातील एका महिलेला बडय़ा कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने अज्ञाताने ८ लाख ७९ हजार ८८७ रुपयांना गंडा घातला. याबाबत धानोरी भागात वास्तव्यास असणाऱ्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञातांनी संपर्क साधला होता.

ऑनलाइन पद्धतीने नोकरीच्या संधीबाबत कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी करण्यात आली होती. तसेच, एका बडय़ा कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष महिलेला दाखविण्यात आले होते. महिलेला एका बँकेच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरण्याची सूचना  करण्यात आली. तिने पैसे जमा केले. मात्र,ज्या क्रमांकावरुन तिच्याबरोबर संपर्क साधण्यात आला होता, तो क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम तपास करत आहेत.