देशात सध्या विकासाचे वारे वाहत असून या विकासाच्या महामार्गावर कोणालाच अस्पृश्य राहायचे नाही. कोणालाच वाहतुकीत वेळ घालवायचा नाही. गावापासून शहरापर्यंत पायाभूत विकासावर आमचे सरकार भर देत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पूर्वीच्या आघाडी सरकारच्या कारभारावरही टीका केली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो ३ मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी कल्याणप्रमाणेच पुण्यातही आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी कर्वे यांची भूमी आणि बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी असलेल्या पुण्याला मी वंदन करतो. मला पुणे आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम दिले. मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे जमलात. याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

देशातील सर्वांत व्यस्त आयटी सेंटरपैकी एक असलेल्या हिंजवडीला ही मोठी सुविधा मिळणार आहे. ८ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या मेट्रो फेज ३ चे भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली आहे. या मार्गामुळे येथील लोकांचे जीवन सुगम होणार आहे. पुढील वर्षाअखेरपर्यंत पुण्यात १२ किमीपर्यंत मेट्रोल धावेल असा विश्वासही त्यांनी दिला.

मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. हे सरकार पायाभूत सेवांवर भर देणारे सरकार आहे. मागील चार वर्षांत या सरकारने पायाभूत विकासासाठी मोठी गुंतवणूक केली असून मागील सरकारच्या काळात याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात ग्रामीण भाग आणि शहरातील पायाभूत विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विकासाचा वेग मंदावल्याची टीका त्यांनी केली.