परिवारवाद देशाचे भले करू शकत नाही, अशी परिकल्पना चाणक्यांनी २३०० वर्षांपूर्वी मांडल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले. पुणे येथे आयोजित ‘आर्य चाणक्य-जीवन और कार्य : आज के संदर्भ में’ या विषयावर ते बोलत होते. चाणक्य नितीचा हवाला देत त्यांनी गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधत भाजपाचा परिवारवादाला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्य चाणक्यांप्रमाणे काम करत आहेत. ते स्वत:ला पंतप्रधान न समजता स्वत:ला प्रधानसेवक मानतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शाह म्हणाले की, राजाचा एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना २३०० वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती, हे उदाहरण सांगत नाव न घेता त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
राजा संविधानाचा प्रथमसेवक आहे. सात विभागात राज्याची विभागणी केली. आजही जगभरात हेच विभाग अस्तित्वात आहे. शासन कर वसूल करण्याचे तंत्र फुलातून मध गोळा करणाऱ्या मधमाशीपासून घेतले. मध जमा होईल आणि फुलाचा सुगंध कायम राहील. राजाचा मोठा पुत्र राजा होण्याची परंपरा चाणक्याने खंडित केल्याचे त्यांनी सांगितले.
क्षमता आधारित व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राज्य चालविले जावे, हा विचार चाणक्यांनी मांडला. तर शासन व्यवस्थेत भ्रष्टाचार हा शाश्वत आहे. तो दूर करण्यासाठी उपाय देखील सुचविले आहेत. तसेच उत्पन्न कसे वाढवावे, विदेश व्यापार निती, देशाची सुरक्षा, साम, दाम, दंड, भेद या तंत्राचा वापर व्यक्तीला मोठे करण्यासाठी नाही. तर राष्ट्र उभारणीच्या कमी वापरले जावे, ही चाणक्यांनी शिकवण दिली. विदेश व्यापारात देशाच्या हिताला प्राधान्य असावे, असे चाणक्यांनी सांगितले आहे.
नरेंद्र मोदींनी चाणक्य वाचले की नाही माहीत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्य चाणक्यांप्रमाणे काम करत आहेत. मोदी हे देशाचा कारभार चालवत आहेत. ते स्वत:ला पंतप्रधान न समजता स्वत:ला प्रधानसेवक मानतात. हे लक्षात घेता नरेंद्र मोदींनी चाणक्य वाचले की नाही माहीत नाही, असे शाह यांनी सभागृहात म्हणातच एकच हशा पिकला. तर भाजपाचे चाणक्य म्हणून अमित शाह यांचा देशाच्या राजकारणात नेहमी उल्लेख केला जातो. मात्र पुण्यातील त्यांच्या भाषणातून नरेंद्र मोदी हेच आर्य चाणक्य असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणातून दाखवून दिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
