समाजमाध्यमावर पोस्ट करून पुणेकर कलाकाराची प्रशंसा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून रोज अनेक पत्रं येत असतात.. मात्र, त्या हजारो पत्रांतून एका पत्राबरोबर असलेले पेपर क्विलिंग प्रकारातील आपलेच चित्र पाहून पंतप्रधान सुखावले. इतकेच नाही, तर समाज माध्यमांमध्ये सक्रिय असलेल्या पंतप्रधानांनी या चित्रासह  समाजमाध्यमावर  पोस्ट लिहून पुणेकर कलाकार वीणा अभ्यंकर यांची प्रशंसा केली. खुद्द पंतप्रधानांकडून झालेल्या कौतुकाने आपल्या कलेचे चीज झाल्याच्या भावनेतून वीणा अभ्यंकर भारावून गेल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीविषयी असलेली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी पुणेकर वीणा अभ्यंकर यांनी पेपर क्विलिंग शैलीतले चित्र तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. गेली तीन वर्षे त्या पेपर क्विलिंग शिकत आहेत.

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी पेपर क्विलिंग शिकत असल्याचेही लिहिले होते. पंतप्रधानांकडून त्यांच्या कलेची दखल घेण्यात आली आणि पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुकाचे पत्रही आले. तसेच ते चित्र पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरही पोस्ट केले.

‘पुण्याच्या वीणा अभ्यंकर यांनी पत्र पाठवले. त्या पेपर क्विलिंग शिकत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. पत्रासह त्यांनी पाठवलेले चित्र पाहून खूपच छान वाटले,’ असे पंतप्रधानांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

माझ्यासाठी सुखद धक्का

‘पंतप्रधानांची झोकून देऊन काम करण्याची पद्धत मला आवडते. त्यांच्या कार्यशैलीने प्रेरणा मिळते. गेली तीन वर्षे मी पेपर क्विलिंग शिकत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी पेपर क्विलिंगचे चित्र तयार करण्याचा मार्ग निवडला. पंतप्रधानांकडून चित्र मिळाल्याबद्दलचे पत्र येईल याची अपेक्षा होती. एवढय़ा कामांचा व्याप असताना त्यांच्याकडून लगेच प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, जेमतेम पंधरा दिवसांतच पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुकाचे पत्र आले. इतक्या लगेच मिळालेल्या प्रतिसादाने खूपच आनंद वाटला. माझ्या एका परिचितांनी पंतप्रधानांची समाजमाध्यमावर चित्र आणि कौतुक करणारी पोस्ट असल्याचे सांगितले. हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता,’ अशी भावना अभ्यंकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.