देशभरातील विविध भागात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या विरोधात महिलांना पेटवून उठले पाहिजे. यासाठी सरकारनेही पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, आपल्या आई आणि पत्नीची काळजी नसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांच्या व्यथा काय समजणार अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी महिलांच्या प्रश्नांवरून मोदींवर निशाणा साधला. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शिंदे म्हणाल्या, देशातील प्रत्येक भागात महिलांवरील अन्याय अत्याचारांच्या घटना घडत आहेत. हे ऐकून अस्वस्थ वाटत असून त्यावर हे सरकार काही करताना दिसत नाही. महिलांना ३३ टक्क्यांवरुन ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना लक्षात घेता आणि समाजातील परिस्थिती पाहता शालेय जीवनापासूनच महिलांचा आदर करण्याबाबतचे शिक्षण देण्याची गरज आहे. मात्र, आपल्याकडे तशी व्यवस्था नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच समाजातील प्रत्येक घटकाने महिलांचा आदर केला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसतात हे पाहून आनंद होतो. मात्र, ज्यावेळी महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येतात तेव्हा मन सुन्न होते. मला देखील १९ वर्षांची मुलगी आहे. ती ज्यावेळी बाहेर जाते, तेव्हा मला देखील मुलीची चिंता वाटते. या सर्व घटना लक्षात घेता केंद्र सरकारने जनतेला अच्छे दिन आणले नाहीत. जीवनावश्यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ होत आहे. या सरकारने किमान महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी केली.