नगरसेवकांच्या हजेरी नोंदणीसाठी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरी पद्धतीला नगरसेवकांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नगरसेवकांची हजेरी अद्यापही जुन्याच पद्धतीने मांडली जात आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी १५७ पैकी  ९५ नगरसेवकांनी नोंदणी केली. बायोमेट्रिकसाठी सहा महिने होऊनही अद्याप सर्व नगरसेवकांची नोंदणी झालेली नाही.
महापालिका सभेतील उपस्थिती नोंदणीसाठी बायोमेट्रिक पद्धती सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला या पद्धतीलाच नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे ही यंत्रणा सुरू होऊ शकली नव्हती. त्यानंतर मुख्य सभागृहाबाहेर यंत्र बसवण्यात आली. ही यंत्र बसवण्यात आल्यानंतर त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन नगरसेवकांना करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच या नोंदणीला नगरसेवकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या टप्प्यात ५० नगरसेवकांनी नोंदणी केली होती. गेल्या सहा महिन्यांत ९५ नगरसेवकांनी नोंदणी केली असून उर्वरित ६२ नगरसेवक अद्याप नोंदणीपासून दूर राहिले आहेत. महापालिका सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले तेव्हापासून ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र नोंदणी होत नसल्याने ही यंत्रणा वापरात नाही. नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद या यंत्रणेद्वारे केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नगरसेवकांच्या नोंदणीअभावी मुख्य सभेत अद्यापही जुन्या पद्धतीप्रमाणे रजिस्टरवर स्वाक्षरी घेऊन उपस्थितीची नोंद केली जात आहे. सर्वाची नोंदणी झाली, की नवी पद्धती अमलात येऊ शकेल. मात्र अद्याप ६२ नगरसेवकांची नोंदणी झालेली नसल्यामुळे सर्वासाठीच जुनी पद्धत अवलंबिली जात आहे.