पुण्यात अनेक वनस्पतितज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी असताना आणि त्यांच्या कामगिरीची दखल वेळोवेळी देशात घेतली जात असताना महापालिकेने मात्र पर्यावरण अवहालापासून या तज्ज्ञांना दूर ठेवल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ही मंडळी पर्यावरण अहवालासाठी मदत करायला तयार असतानाही या अहवालाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याचेही सौजन्य महापालिकेने दाखवले नाही.
महापालिका प्रशासनाने तयार केलेला शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी आला असून या अहवालावर सोमवारपासून चर्चा सुरू झाली. सभेत पहिल्या दिवशी भाजपचे दिलीप काळोखे, माधुरी सहस्रबुद्धे, मनीषा घाटे, राष्ट्रवादीच्या नंदा लोणाकर, काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि मनसेच्या अस्मिता शिंदे यांची भाषणे झाली. दत्ता बहिरट यांनी चाळीस मिनिटांच्या भाषणात अहवालातील अनेक चुका दाखवत अहवालाचे वाभाडे काढले आणि अनेक चांगल्या सूचनाही केल्या. पर्यावरण अहवालाबरोबरच शहरासाठी वृक्षारोपणाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.
पर्यावरणाच्या क्षेत्रात वर्षांनुवर्षे काम करणारे आणि प्रत्यक्ष आयुष्यातही पर्यावरण जगणारे अनेक जण पुण्यात आहेत. अनेक वनस्पतितज्ज्ञ शहरात आहेत. या विषायांमधील तज्ज्ञ मंडळी पुण्यात आहेत. श्री. द. महाजन, श्रीकांत इंगळहळ्ळीकर, हेमा साने, डॉ. मंदार दातार, डॉ. सचिन पुणेकर अशी अनेक नावे सांगता येतील. वास्तविक पुण्याचा पर्यावरण अहवाल तयार करताना अशा अनेकांची मदत घ्यायला हवी. त्याबाबत मी त्यातील काही जणांशी चर्चा केली होती आणि त्यांनीही आनंदाने काम करण्याची तयारी दर्शवली होती. मी गेल्या वर्षीही अहवालावर बोलताना या तज्ज्ञांची मदत घ्या अशी सूचना केली होती; पण दीड वर्षांत एकाही अधिकाऱ्याला या मंडळींशी चर्चा कराविशी वा त्यांची मदत घ्यावीशी वाटली नाही. इतकेच नाही, तर पुण्याच्या पर्यावरणाबाबत त्यांचे विचार ऐकण्याची तसदीही कोणी घेतली नाही, असे बहिरट यांनी या वेळी सांगितले.
शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम फक्त छायाचित्रे काढण्यासाठीच केले जातात आणि कोणत्या जागी कोणती झाडे लावली पाहिजेत याचा कोणीही विचार करत नाही. चुकीच्या ठिकाणी चुकीची झाडे लावली जात आहेत, असे सांगून बहिरट म्हणाले, की पुण्यातील अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी उपाय करण्याबरोबरच अशा वृक्षांची माहिती देणारे हरितफलक लावावेत.
दिलीप काळोखे यांच्या भाषणाला दाद
भाजपतर्फे या वेळी प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या दिलीप काळोखे यांनी पर्यावरण अहवालावरील चर्चेला सुरुवात केली. भाषणाची चांगली तयारी करून आलेल्या काळोखे यांनी एक तासाच्या भाषणात पर्यावरणासंबंधीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या भाषणाला सभेत चांगली दाद मिळाली.