महापालिकेचे २०१९-२०२० साठीचे सहा हजार ७६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

प्रतिनिधी, पुणे</strong>

महापालिकेचे सन २०१९-२०२० या वर्षांसाठीचे सहा हजार ७६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून शुक्रवारी मुख्य सभेला सादर करण्यात आले. जुन्या प्रस्तावित योजना पूर्ण करण्यावर अंदाजपत्रकात भर देण्यात आला असून वाहतूक सक्षमीकरण आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात तब्बल ७०० कोटींची वाढ करण्यात आल्यामुळे अंदाजपत्रक फुगवटय़ाचा प्रश्न येणाऱ्या आर्थिक वर्षांत कायम राहणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभेला अंदाजपत्रक सादर केले. वर्तुळाकार मार्ग, बीआरटीचे सक्षमीकरण, पीएमपीच्या गाडय़ांची खरेदी, पंतप्रधान आवास योजना, समान पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नदी संवर्धन आदी योजनांची कामे नव्या वर्षांत मार्गी लावण्याचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. अंदाजपत्रक सादरीकरणाच्या खास सभेत महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेता दिलीप बराटे, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, बिपीन शर्मा, रूबेल अगरवाल यांची उपस्थिती होती.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये महापालिकेला १५ फेब्रुवारीअखेपर्यंत चार हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मार्चअखेपर्यंत उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत दीड हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट येणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थायी समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात ७०० कोटींनी वाढ केल्यामुळे पुढील वर्षी अंदाजपत्रकीय तूटही वाढणार असून ती किमान एक हजार ८०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी तरतूद करताना फुगवटय़ाचा प्रश्नही कामय राहणार आहे.

अपेक्षित उत्पन्न

उत्पन्नाच्या बाजूचा विचार करता स्थानिक संस्था करापोटीच्या अनुदानातून ११९ कोटी, वस्तू आणि सेवा कर विधेयकातून एक हजार ८०१ कोटी, मिळकत करातून एक हजार २५० कोटी, शासकीय अनुदान १२१ कोटी, जेएनएनयूआरएम आणि अमृत योजनेतून १३ कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० कोटी, शहर विकास शुल्कातून ६९ कोटी, बांधकाम परवानगीतून ७६१ कोटी आणि अन्य जमा बाबीतून ७१४ कोटींचे उत्पन्न अंदाजपत्रकात गृहीत धरण्यात आले आहे. कर्जरोख्यातून २०० कोटींचे उत्पन्नही प्राप्त होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मोठय़ा प्रकल्पांची कामे शहरात सुरू झाली आहेत. ती वेगात आणि वेळेत पूर्ण करण्यावर तसेच चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आला आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. थकबाकी वसुलीची प्रभावी यंत्रणा राबवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन योजना पूर्ण करण्यात येतील.

– योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

सर्व घटकांना सामावून घेणारे अंदाजपत्रक आहे. शहरी जलयुक्त शिवार ही संकल्पना महत्त्वाची असून वाहतूक प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. शहराच्या सर्वागीण विकासासाठी अंदाजपत्रकात अनेक विकासकामांवर भर देण्यात आला आहे.

  – मुक्ता टिळक, महापौर

विकासगंगा

३०१ कोटी रुपये समान पाणीपुरवठा योजनेसाठी

१८५ कोटी रुपयांची भरीव तरतूद भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेसाठी

१६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांची कामे

१.७० कोटी रुपये तलाव, विहिरी, झरे आदी नैसर्गिक जलस्रोतांचा विकासासाठी तरतूद.

एकात्मिक वाहतूक

नगर रस्ता हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. तशी घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्गाचे नियोजन, बीआरटी मार्गाचे सक्षमीकरण करण्यात येईल.