महापालिकेच्या विविध खात्यांसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना चालू महिन्यापासून किमान वेतन मिळणार आहे. या कामगारांना देण्यासाठी जेवढे वेतन महापालिका ठेकेदारांना देते त्यात मोठी कपात करून ठेकेदार कामगारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेऊन आता रोजंदारीवरील कामगारांना किमान वेतन देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.
उपमहापौर आबा बागूल यांनी ही माहिती दिली. महापालिकेची विविध कामे ठेकेदारांकडून करून घेतली जातात. त्यासाठी ठेकेदार जे कामगार घेतात ते ठेकेदारांकडे रोजंदारी पद्धतीवर किंवा करार पद्धतीवर काम करतात. ठेकेदार महापालिकेकडून किमान वेतन कायद्यानुसार या कामगारांचे पैसे घेतात; पण प्रत्यक्षात मात्र कामगारांना महिना चार ते पाच हजार एवढीच रक्कम देतात. कामगारांना ठेकेदार किमान वेतन देत नसल्याबद्दल उपमहापौर आबा बागूल तसेच काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेण्यात आली असून त्याबाबत आयुक्तांनी चौकशी समितीही नेमली आहे.
ठेकेदारांकडील कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे या मागणीबाबत उपमहापौर बागूल यांच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. उपायुक्त मंगेश जोशी, समाज कल्याण अधिकारी हनुमंत नाझीरकर, कामगार सल्लागार अधिकारी नितीन केंजळे हे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन देण्याबाबत बैठकीत चर्चा होऊन या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.