महापालिकेची कामे करणारे अनेक ठेकेदार कामे न करताच बिले घेतात, अशी माहिती खुद्द सभागृहनेता सुभाष जगताप यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली आणि त्यांची माहिती ऐकून संपूर्ण सभागृह थक्क झाले. त्यानंतर ठेकेदाराचे नाव जाहीर करण्याच्या मागणीवरून सभेत मोठा गोंधळ झाला. या प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश महापौर चंचला कोद्रे यांनी आयुक्तांना दिला.
महापालिकेची विकासकामे योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण होण्यासंबंधीची चर्चा सभेत सुरू होती. वॉर्डामध्ये सुरू असलेल्या कामांची स्थिती समजावी यासाठी जीपीएस यंत्रणा बसवली जाईल. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणती कामे सुरू आहेत, त्याची माहिती मिळू शकेल, असे या वेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आधीच कामांना उशीर होतोय आणि आणखी त्यात जीपीएस यंत्रणा कशाला, असा प्रश्न उपस्थित करत विशाल तांबे यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना या वेळी केली.
ही चर्चा सुरू असताना सभागृहनेता सुभाष जगताप यांनीही प्रशासनावर टीका करत, अनेक ठेकेदार महापालिकेची कामे घेतात आणि ती न करताच बिले देखील घेतात, असा थेट आरोप सभेत केला. एवढाच आरोप करून ते थांबले नाहीत, तर कामे न करता बिले घेणाऱ्यांची तक्रार देखील अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले. जगताप यांच्या या विधानामुळे सभेत एकच गोंधळ झाला आणि ज्या ठेकेदारांची तक्रार जगताप यांनी केली आहे त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी अनेक सदस्य करू लागले. तसेच अतिरिक्त आयुक्तांनीही या प्रकाराबाबत सभेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी, यासंबंधीची लेखी माहिती माझ्याकडे आलेली नाही, तसेच यासंबंधीची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही, असे निवेदन सभेत केले. त्यांच्या या निवेदनावरही सभेत मोठा गोंधळ झाला. नावे न घेता तसेच ठोस पुरावे न देता आरोप केले तर सभागृहाची बदनामी होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नावे जाहीर करावीत, अशीही मागणी या वेळी लावून धरण्यात आली.
या मागणीनंतर नितीन वरगडे असे एका ठेकेदाराचे नाव जगताप यांनी सभेत सांगितले. या ठेकेदाराने काम न करताच पाच लाख रुपयांची बिले घेतल्याचे जगताप म्हणाले. या ठेकेदाराच्या सर्व कामांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यानंतर महापौरांनी दिले.