शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदाई केली जात असली, तरी खासगी केबल कंपन्यांच्या रस्ते खोदाईला ३० एप्रिलपर्यंतच परवानगी दिली जाणार असून त्यानंतर कोणत्याही प्रकारची रस्ते खोदाई करू देऊ नये असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्या ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे तेथील रस्ते १५ मे पर्यंत पूर्ववत करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील पावसाळापूर्व कामांच्या तयारीबाबत महापौरांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत रस्ते खोदाईला ३० एप्रिलपर्यंतच परवानगी द्यावी असे आदेश देण्यात आले. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर, उपायुक्त सुरेश जगताप यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरात रिलायन्स, एमएनजी तसेच बीएसएनएल आदींकडून केबल टाकण्यासाठी सध्या रस्ते खोदाई केली जात आहे. रिलायन्स कंपनीला शहरात २२० किलोमीटरसाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत १२० किलोमीटर रस्ते खोदाई कंपनीकडून करण्यात आली आहे. एमएनजीला २० किलोमीटरची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांनी ११ किलोमीटर खोदाई केली आहे. तसेच बीएसएनएलला १९० किलोमीटरची परवानगी देण्यात आली असून १२० किलोमीटरची खोदाई करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
खासगी कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी ३० एप्रिलपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर खोदाई सुरू राहिल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच संबंधित कंपनीला रस्ते खोदाईसाठी दिलेली परवानगी रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटिसही दिली जाईल, असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिकेची जी विकासकामे शहरात सुरू आहेत तसेच प्रकल्पांची जी कामे सुरू आहेत, त्यांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.  महापालिकेची जी कामे शहरात सुरू आहेत, त्या कामांना १५ मे पर्यंत रस्ते खोदाईसाठी परवानगी देण्यात आल्याचेही महापौरांनी सांगितले. खासगी कंपन्यांनी जेथे खोदाई केली आहे ते सर्व रस्ते १५ मे पर्यंत पूर्ववत होतील, याकडे लक्ष देण्याबाबतही सांगण्यात आले असून रस्ते पूर्ववत करण्यासंबंधीचे आदेशही बैठकीत देण्यात आले.