चौमाही वाटपामध्ये नाटय़संस्थांना मिळालेल्या तारखा यापुढे केवळ शासकीय कार्यक्रम असतील तरच काढून घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे या तारखा रद्द करण्याचे अधिकार हे महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे राखीव असणार आहेत.
महापालिका अखत्यारीतील नाटय़गृहांच्या तारखा हा सदैव चर्चेचा विषय ठरला आहे. नाटय़संस्थांना दिलेल्या तारखा शासकीय कार्यक्रम असतील तर काढून घेण्याची तरतूद नियमावलीमध्ये समाविष्ट आहे. मात्र, अनेकदा शासकीय कार्यक्रमांखेरीज होणाऱ्या कार्यक्रमांसाठीदेखील काढून घेतल्या जातात, अशी नाटय़संस्थांची तक्रार असते. या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या दालनामध्ये नाटय़संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये नाटय़संस्थांच्या तारखा काढून घेण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे असतील हा निर्णय घेण्यात आला.
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या तारखा वाटपामध्ये नाटय़संस्थांऐवजी बाहेरच्या संस्थांनाच प्राधान्य दिले गेले आहे, याकडे अतिरिक्त आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. मध्यवर्ती असल्यामुळे सर्वाचाच बालगंधर्व रंगमंदिरासाठीचा आग्रह असतो. मात्र, सर्व नाटय़संस्थांनी केवळ बालगंधर्व रंगमंदिराचा आग्रह न धरता अन्य नाटय़गृहांमध्येही प्रयोग केले तर त्या त्या भागातील रसिकांचीही सोय होऊ शकेल, असे मत राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृह आणि औंध येथील भीमसेन जोशी नाटय़गृह येथे प्रयोग करताना येत असलेल्या समस्या सांगून त्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी विनंती जगताप यांना करण्यात आली.
नाटय़गृहांच्या तारखावाटपासंदर्भात नियमावली निश्चित करण्यात येणार असून, या नियमावलीचा पाठपुरावा करण्यासंदर्भातील निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला. राजकीय कार्यक्रमांमुळे नाटय़संस्थांच्या तारखांवर होणारे अतिक्रमण या निर्णयामुळे रोखले जाईल अशी आशा आहे, असे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले. प्रसिद्ध अभिनेते आणि नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे विभागाच्या अध्यक्ष भाग्यश्री देसाई, नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रवीण बर्वे, समीर हंपी, शशिकांत कोठावळे यांच्यासह भवन रचना विभागाचे अभियंता राजेंद्र राऊत, विद्युत विभागाचे अभियंता विजय दहिभाते आणि रंगमंदिर व्यवस्थापक भारत कुमावत या बैठकीस उपस्थित होते.