पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (१२ जून) निवडणूक होणार असून लक्ष्मीकांत खाबिया आणि वासंती काकडे यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी सुरू झाली आहे.
शिक्षण मंडळात झालेल्या कुंडय़ा खरेदीतील गैरव्यवहारानंतर या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केली होती. त्यानंतर शिक्षण प्रमुखांना तातडीने सेवामुक्त करण्यात आले होते. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने रवी चौधरी यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आता निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि रवी चौधरी यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे. यापुढील अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा पक्षात सुरू आहे. लक्ष्मीकांत खाबिया आणि वासंती काकडे यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी शक्यता आहे. मंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असा दोन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला आहे. काँग्रेसनेही उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांचा राजीनामा नुकताच घेतला असून काँग्रेस आता कोणाला संधी देणार याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. काँग्रेसमध्ये अमित मुरकुटे आणि नरुद्दीन सोमजी हे उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.
मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी होणार असून अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाल्यानंतर त्याच बैठकीत उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक होईल, असे सांगण्यात आले.