महापालिका शिक्षण मंडळाकडून शालेय साहित्याच्या खरेदीत होणारे घोटाळे हा नेहमीच टीकेचा विषय ठरतो आणि मंडळाकडून या खरेदीत घोटाळे केले जात होते हे आता सिद्ध झाले आहे. मंडळाकडून कंपासपेटय़ा, वह्य़ा आणि अन्य शालेय साहित्याची खरेदी दीड ते पाच पट जादा दराने होणार होती. मात्र, ती प्रक्रिया रद्द करून महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवताच तब्बल ७५ लाख रुपये कमी दराच्या निविदा आल्यामुळे आता करदात्यांचे ७५ लाख रुपये वाचणार आहेत.
शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात कंपासपेटय़ा, वह्य़ा, रंगपेटय़ा, चित्रकला वह्य़ा आदी प्रकारातील शालेय साहित्याची खरेदी केली जाणार होती. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, ही खरेदी बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक दराने होत असल्याचा आक्षेप घेणारे लेखी पत्र ‘सजग नागरिक मंच’ने आयुक्तांना दिले होते. त्या पत्राची तातडीने दखल घेत आयुक्तांनीही ही खरेदी प्रक्रिया रद्द केली होती, अशी माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यानच्या काळात शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण मंडळाचे खरेदीचे अधिकार संपुष्टात आले आणि खरेदीची ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाने राबवली. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्यानंतर सर्व वस्तूंचे दर कमी आले आहेत. फक्त कंपासपेटय़ा आणि वह्य़ांचा विचार केला, तर या खरेदीत महापालिकेचे ४८ लाख रुपये वाचणार आहेत आणि एकूण खरेदीचा विचार केल्यास या खरेदीप्रक्रियेत ७५ लाख रुपये वाचणार आहेत, असेही वेलणकर यांनी सांगितले.
शिक्षण मंडळ वह्य़ांची खरेदी (१९२ पाने) प्रतिनग २९ रुपयांना करणार होते, त्याच वह्य़ांसाठी आता २१ रुपये दर आला आहे. मंडळाकडून कंपासपेटय़ांची खरेदी ८९ रुपयांना केली जाणार होती. तीच खरेदी आता ५९ रुपयांना होईल. अशा प्रकारे प्रत्येक वस्तूचे दर मंडळासाठी वाढीव पद्धतीने लावण्यात आले होते. तेच दर आता महापालिकेच्या निविदेमध्ये बाजारभावाप्रमाणे आले आहेत. आयुक्तांनी फेरनिविदा प्रक्रिया राबवल्यामुळे महापालिकेचे ७५ लाख रुपये वाचणार असून त्याबद्दल संघटनेतर्फे प्रशासनाचे अभिनंदनही करण्यात आले आहे.