राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीला पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. कमी वेळेत आधिकधिक मतदारापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट उमेदवारांचे आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार सिनेकलावंत, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे आयोजन करत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकाला त्रासाला सामोरे जावे लागत असून आज पुण्यातील पेठांच्या भागात पदयात्रांमुळे वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला बसला आहे.


प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उमेदवार आम्ही प्रभागाचा विकास करू, रस्ते चांगले तयार केले जातील. वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल अशी भरमसाठ आश्वासने निवडणुकी दरम्यान देतात. त्याची १०० टक्के अंमलबजावणी होत नसल्याचे मागील काही निवडणुकांमधून समोर आले आहे. तसेच उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचाराला प्रत्येक प्रभागात जातात. त्यावेळी अनेक चौकांमध्ये वाहतुक कोंडीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आज पुणे शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, मंगळवार पेठ आणि दांडेकर पूल या भागात ११ ते १२ दरम्यान वाहतुक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. प्रत्येक चौकात लांबच लांब वाहनाच्या रांगा पाहावयास मिळाल्या. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसा प्रचाराला आणखी वेग येईल. पदयात्रा वाढतील, राजकीय नेत्यांच्या सभाही होती. मात्र या काळात सर्वसामान्य नागरिकाला या उमेदवारांचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित.