News Flash

‘जिंकण्यासाठी काहीपण’ हेच सूत्र

‘श्रीमंत’ महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी पिंपरीत भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढत

‘श्रीमंत’ महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी पिंपरीत भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढत

भाजप-शिवसेनेची युती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी न झाल्याने पिंपरी पालिकेच्या राजकीय आखाडय़ात सर्वच पक्ष स्वतंत्रपणे उतरले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित ‘दादा’ पवार यांच्या ताब्यात गेल्या १५ वर्षांपासून असलेली ‘श्रीमंत’ महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपने शड्डू ठोकले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना पूर्ण ताकद दिली आहे. सत्तेतून झालेला विकास हा राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असून विकासाच्या नावाखाली भ्रष्ट कारभार, यावर विरोधक तुटून पडले आहेत. साम, दाम, दंड, भेद वापरून सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी यांच्यात तुल्यबळ ‘सामना’ रंगला असून सगळे संकेत, परंपरा, नीतिमत्ता गुंडाळून ठेवण्यात आली आहे आणि जिंकण्यासाठी काहीपण’ हेच प्रत्येकाचे सूत्र दिसून येत आहे.

िपपरी पालिकेच्या १२८ जागांसाठी जवळपास ७५० उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षांनी ‘स्व’बळावर लढण्याची खुमखुमी दाखवून दिली असली तरी कोणत्याही पक्षाला सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार देता आलेले नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून भोसरीत भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आले. सत्ताप्राप्तीसाठीचा ६५ हा ‘जादूई आकडा’ गाठता येईल, अशी खात्री कोणत्याही पक्षाला नाही आणि तशी परिस्थितीही  नाही. त्यामुळे ५० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीत प्रामुख्याने चढाओढ आहे. अजित पवार शहराचे कारभारी असून राष्ट्रवादीचा तोच निवडणूक चेहरा आहे. पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरून त्यांच्यावर अन्य राजकीय पक्ष तुटून पडतील, असे प्रारंभी वातावरण होते आणि तशी सुरुवातही झाली होती. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजप-शिवसेनेत ज्या पद्धतीने जुंपली आहे, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत, त्याचे पडसाद पिंपरी पालिकेच्या निवडणुकांवर पडले आहेत. निकालानंतर सरकार पडेल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत लागेल, असे गणित डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांच्या बाबतीत ‘सौम्य’ धोरण ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपची सर्व मदार मुख्यमंत्र्यांवर आहे. ते चिंचवडला येऊन गेले, तेव्हा त्यांनी आवश्यक तेवढीच टीका पवारांवर केली. उद्धव ठाकरे यांनी तर अजित पवारांचे नावही घेतले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच त्यांनी आरोपांच्या चौफेर फैरी झाडल्या. शिवसेनेकडे दोन खासदार, एक आमदार आहे. मात्र, त्यांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वेसर्वा असलेल्या काँग्रेस पक्षासह, राज ठाकरे यांची मनसे, रामदास आठवले यांची रिपाइं आणि ओवेसी बंधूंच्या एमआयएम आदी पक्षांना आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. सत्ता जाण्याची अजित पवारांना धास्ती आहे. त्यांनी सर्व सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत.

तेच प्रश्न तीच आश्वासने

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर रद्द करणे, संरक्षण खात्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवणे, २४ तास पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी व ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, यांसारखे अनेक प्रश्न आहेत. वर्षांनुवर्षे त्यांचे निर्णय झालेले नाहीत. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील भ्रष्ट कारभार व सत्ताधारी नेत्यांची दुकानदारी, यावरून विरोधकांनी रान पेटवले आहे. पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांसमवेत भ्रष्टाचारात वाटा घेणारे, मांडवली करणारेच निवडणुकीच्या आखाडय़ात आरोप करताना आघाडीवर आहेत.

शहराध्यक्षांच्या प्रतिष्ठा पणाला

पिंपरी पालिका निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे आणि मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर प्रामुख्याने गावकी-भावकीच्या राजकारणाचे आव्हान आहे. संजोग वाघेरे यांच्या पत्नी पिंपरीगाव प्रभागातून रिंगणात आहेत. पिंपरीकरांच्या राजकारणामुळे त्रस्त असलेल्या वाघेरे यांना पत्नीला निवडून आणण्याचे आव्हान आहे. राहुल कलाटे वाकड प्रभागातून स्वत: रिंगणात आहेत. काँग्रेसचा एकमेव चेहरा असलेल्या सचिन साठे यांच्या भवितव्यावरच शहरात काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. सचिन चिखले व त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिखले एकाच प्रभागातून निवडणुका लढत आहेत. चिखले दाम्पत्य हे मनसेचे एकमेव आशास्थान आहे.

‘आयाराम-गयाराम’ आणि पक्षनिष्ठेची ‘ऐशीतैशी’

पिंपरी पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकांचे ‘आयाराम-गयाराम’ आणि पक्षनिष्ठेची ‘ऐशीतैशी’ हे वैशिष्टय़ मानता येईल. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आणि उमेदवारांनी कोलांटउडय़ा घेत मिळेल ती उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘इकडून-तिकडे’ हा गोंधळ सुरू होता. स्वच्छ चारित्र्य, निष्ठा, उच्चशिक्षित, निव्र्यसनी, सुस्वभावी अशा प्रकारच्या गुणवत्तेला फारसे कोणी महत्त्व दिले नाही. ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेणारे ‘लक्ष्मीपुत्र’ आणि कसेही निवडून येऊ शकणारे यांचीच बाजू वरचढ राहिली आहे.

घाऊक पक्षांतरे

पिंपरीत २००२ पर्यंत काँग्रेसचे प्राबल्य होते. त्यानंतर, काँग्रेस व राष्ट्रवादी ‘आमने-सामने’ लढले. मात्र, कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे पालिका ताब्यात घेतली. २००७ मध्ये राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढून एकहाती सत्ता घेतली. पुढे, २०१२ च्या पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीची सरशी झाली. १२८ पैकी जवळपास ८३ नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. विकासाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीने पुन्हा पालिका ताब्यात घेण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासूनच शहराच्या राजकारणाचे तसेच राष्ट्रवादीचे फासे पलटले आहेत. ‘आयाराम-गयाराम’नी कहर केला. जवळपास ३० नगरसेवकांनी आपला मूळ पक्ष सोडून नव्या ठिकाणी ‘घरोबा’ केला. बलाढय़ राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले. भ्रष्टाचाराचे सतत होणारे आरोप, न थांबणारी पक्षातील गळती आदी कारणास्तव राष्ट्रवादीची लोकप्रियता खालावली. दुसरीकडे, भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या. आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांना शहराध्यक्षपद दिले. पाठोपाठ, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह या तीनही नेत्यांचे समर्थक आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. जुन्यांना डावलून नव्यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमध्ये बरीच आदळआपट झाली. भाजपची ‘राष्ट्रवादी’ झाल्याची ओरड झाली आणि तो प्रचाराचा मुख्य मुद्दाही बनला. काँग्रेसचे १४ नगरसेवक होते. अनेकांनी भाजप तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. चार सदस्यसंख्या असलेल्या मनसेचा एक नगरसेवक भाजपच्या तर दुसरा शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात आहे. रिपाइंच्या ज्येष्ठ नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे पक्षादेश डावलून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 1:13 am

Web Title: pmc election 2017 ncp bjp shiv sena
Next Stories
1 लोकांना मूर्ख बनवण्याचा शिवसेना-भाजपचा धंदा: राज ठाकरे
2 भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; भोसरीत तणावाचे वातावरण
3 पदयात्रा आणि रोड शो मुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी
Just Now!
X