पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथींना कमालीचा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक ७ (खुला प्रवर्ग) अर्ज दाखल केला आहे. आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार संजय काकडे यांनी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. बंडखोरी नाकारण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करत असताना, नाराजी आणि बंडाळीचे वारे वाहू लागले. त्यातील प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ असलेले विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना आज प्रभाग क्रमांक ७ मधून तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांना भाजपच्या दारात जावे लागले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आमदार अनिल भोसले यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर रेश्मा भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळाले. त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी त्यांचे व्याही म्हणजे खासदार संजय काकडे यांनी विशेष मदत केल्याचे बोलले जात आहे. रेश्मा भोसले या भाजपकडून निवडणूक लढणार आहेत. त्या भाजपत दाखल झाल्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही भाजप भक्कम झाला आहे.

दरम्यान, अनिल भोसले हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचे मानले जाते. त्यांच्या पत्नी भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याने आगामी राजकीय वाटचालीमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यामधून राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र अजित पवार यांनी पुन्हा अनिल भोसले यांच्यावर विश्वास दाखवत विधानपरिषदेची उमेदवारी देत त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणले होते. महापालिका निवडणुकीत मात्र, त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी भाजपकडून लढण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे अनेक कार्यकर्त्यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी आहे. येत्या काळात मतांच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण अजित पवार नाराजांसह बंडोबांना कशा प्रकारे थंड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.