07 March 2021

News Flash

वडगावशेरीतील राष्ट्रवादीचा गड नेस्तनाबूत

पुणे आणि पिंपरीतील महापलिका निवडणुकांचा निकाल गेल्या आठवडय़ात लागला.

 

वडगावशेरी, शिवाजीनगरमध्ये भाजपचे पूर्ण वर्चस्व

पुणे आणि पिंपरीतील महापलिका निवडणुकांचा निकाल गेल्या आठवडय़ात लागला. पुण्यात भारतीय जनता पक्षाने तब्बल ९८ जागा मिळवित निर्विवाद बहुमत मिळविले, तर पिंपरीतही ७७ जागा मिळवून भाजपने सत्ता संपादन केली. पुण्यात वडगावशेरी मतदारसंघाचा ताबा राष्ट्रवादीकडून भाजपने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व बारा जागा भाजपनेजिंकल्या आहेत तर हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला अधिक जागा मिळाल्या आहेत. खडकवासला आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातही दोन्ही काँग्रेसना यश मिळाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची परिस्थिती थोडी बरी राहिली. महापालिका निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचे हे विश्लेषण.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या मतदार संघातील सहा प्रभागांपैकी तीन प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी तर झालेच, पण प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांनही यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरसेवक भाजपने पक्षात घेतले त्यातील बहुतांश प्रभागात त्यांनी या निवडणुकीत कमळ फुलविल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीपासून बदललेले राजकारण, प्रभागांची झालेली फेररचना, महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपच्या दारी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, अन्य पक्षांमधील पक्षांतर्गत स्पर्धा आणि त्यातून स्थानिक पातळीवर झालेल्या उलाथापालथी, गावकी-भावकीचे राजकारण या सर्व बाबींचा पूर्ण फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी ढासळत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वडगांवशेरी विधानसभा मतदार संघाचा बालेकिल्ला निवडणुकीत पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.

कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ, विमाननगर-सोमनाथनगर, खराडी-चंदननगर, वडगांवशेरी-कल्याणीनगर आणि येरवडा या सहा प्रभागातील चोवीस पैकी चौदा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. खराडी-चंदननगर वगळता तीन प्रभागात पूर्ण तर उर्वरित प्रभागात भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. खराडी-चंदननगर प्रभागातील यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रतिष्ठा टिकवली आहे. या विजयात भाजपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांचीही साथ मिळाली. निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचे राजकारण करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात दिलेली संधी भाजपच्या पथ्यावर पडली. एकूणच राष्ट्रवादीच्या कमकुवत झालेल्या बाजूचा फायदा उचलण्यात भाजपला वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात यश मिळविता आले.

हडपसर विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेसला यश

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघातील सात प्रभागातील अठ्ठावीस जागांपैकी तेरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवित हडपसर विधानसभा मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. या मतदार संघातील एका प्रभागात संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. तर काही प्रभागात शिवसेनेनेही त्यांची ताकद दाखवून दिली.

मुंडवा-मगरपट्टा सिटी, हडपसर गावठाण-सातववाडी, रामटेकडी-सय्यदनगर, वानवडी, महंमदवाडी-कौसरबाग या प्रभागांचा समावेश या मतदार संघात आहे. तसेच दोन प्रभागांचे काही भाग या मतदारसंघात आहेत. रामटेकडी-सय्यदनगर हा तीन सदस्यांचा प्रभाग आहे. पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून हडपसर विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. आजी-माजी महापौरांचा प्रभाग या विधानसभा मतदार संघात येत असल्यामुळे येथे वर्चस्व राखणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आव्हान होते. शिवसेनेबरोबरच भाजपचेही आव्हान राष्ट्रवादीपुढे होते. मात्र बहुतेक सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळविले. दोन जागा अपक्षांना मिळाल्या तर तीन जागांवर भाजपला यश मिळाले. एमआयएमचा बोलबाला आणि शिवसेनेची ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने येथे चांगले यश मिळवले. मुंढवा-मगरपट्टा सिटी, हडपसर गावठाण-सातववाडी, वानवडी या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यापैकी मुंढवा-मगरपट्टा सिटीमध्ये पूर्ण पॅनेल आणण्यात त्या पक्षाला यश आले. भाजपला या मतदार संघात अवघ्या चार जागा मिळाल्या, तर महंमदवाडी-कौसरबाग प्रभागात शिवसेनेने मिळविलेल्या दोन्ही जागा चर्चेच्या ठरल्या. रामटेकडी-सय्यनदनगर या प्रभागातून दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले. निवडणुकीपूर्वी नगरसेवक रईस सुंडके यांच्यासह अन्य काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आघाडीची चर्चा सुरु झाल्यानंतर या मतदार संघातील काही प्रभागात जागा वाटपाचा तिढा होता. त्यामुळे येथे दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. पण काँग्रेसची ताकद फारशी नसल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाल्याचेही दिसून येत आहे.

खडकवासला, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ : दोन्ही काँग्रेसना यश

पुणे :  खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांना त्यांचे बालेकिल्ले काही प्रमाणात राखता आले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला काही जागांवर यश मिळाले असले तरी दोन्ही काँग्रेसना या मतदार संघांनी साथ दिल्याचे दिसून येत आहे. आघाडी केल्याचा फायदा दोन्ही काँग्रेसला या मतदारसंघात जागा मिळविण्याच्या दृष्टीने झाला.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोहियानगर-काशेवाडी, ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल, कोरेगांव पार्क-घोरपडी या प्रभागांचा समावेश होतो. प्रभागांच्या नव्या रचनेत काही भाग दुसऱ्या मतदारसंघाला जोडले गेले असले तरी पूर्वीपासूनच येथे काँग्रेसची ताकद आहे. बहुभाषिक आणि झोपडपट्टय़ांचा भाग अशी या मतदार संघाची ओळख आहे. या प्रभागांपैकी ताडीवाला रस्ता,-ससून हॉस्पिटल, लोहियानगर-काशेवाडी येथील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी काँग्रेसला हात दिला. भाजपला येथे काही जागा मिळाल्या असल्या तरी प्रभागांमध्ये काही नव्याने आलेल्या भागांचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले.

खडकवासला विधानसभा मतदार संघातील वडगांव धायरी-वडगांव बुद्रुक हा प्रभाग वगळता राजीव गांधी उद्यान-बालाजीनगर, धनकवडी-आंबेगाव पठार, आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. या भागातील आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने आघाडी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्यामुळे तेथे काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप अशीच लढत येथील बहुतेक प्रभागात झाली. त्यात राष्ट्रवादीला यश आले.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ : महापालिकेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या

पुणे :  महापालिकेच्या नव्याने झालेल्या प्रभागांच्या रचनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही या दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाच्या लढाईचा फायदा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला झाला. या मतदारसंघात भाजपला बारा पैकी बारा जागा मिळाल्या. विशेष करून औंध-बाणेर, बालेवाडी, पाषाण, बोपोडी या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मानणाऱ्या भागातही भाजपचा या निवडणुकीच्या निमित्ताने शिरकाव झाला आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसचे प्राबल्य आहे. काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली होती. त्यामुळेच येथील बहुतेक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. एकमेकांची ताकद कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही काँग्रेसना यश मिळाले नाही, शिवाय त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागातही त्यांना यश मिळू शकले नाही. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी, औंध-बोपोडी आणि डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या तीन प्रभागांचा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. काँग्रेसचे पारंपरिक मतदार येथे असले तरी काही ठिकाणी सक्षम उमेदवारांसाठी पक्षाला शोधाशोध करावी लागली. तर काही ठिकाणी उमेदवार असूनही पॅनेल निवडून आणतील, असे उमेदवार त्यांना मिळाले नाहीत. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले आणि अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणुकीपूर्वी सुरु झालेला वाद, त्यांची पत्नी रेश्मा यांना भाजपने दिलेली उमेदवारी या गोष्टीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पराभवामागे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी, औंध-बोपोडीसह डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभागातील सर्व जागा भाजपला मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटलेली ताकद, अनेक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, काँग्रेसकडे असलेला सक्षम उमेदवारांचा अभाव, अशा गोष्टीही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरल्या. या मतदार संघात शिवसेनेची ताकद असली तरी ती मर्यादित राहिल्याचेही स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:24 am

Web Title: pmc election 2017 results pcmc elections 2017 result vadgaon sheri assembly constituency
Next Stories
1 पिंपरी पालिकेत बाबर परिवारातील नवीन चेहरा
2 शहरबात पुणे : कारभारी बदलले; आता समस्या सुटणार का?
3 पेट टॉक : मत्स्यपालनाचे बदलते रूप
Just Now!
X