एका मतासाठी दोन ते आठ हजारांचा ‘भाव’

‘श्रीमंत’ महापालिकेच्या निवडणुकीत रविवारी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ‘मतांची सौदेबाजी’ सुरू झाली आहे. शहरभरातील विविध प्रभागांचा आढावा घेतल्यानंतर शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात ‘मतांचा बाजार’ मांडण्यात आला असून एका मतासाठी सरासरी दोन हजाराचा ‘भाव’ फुटला आहे. धनदांडगे उमेदवार िरगणात असलेल्या ठिकाणी हाच भाव एका मतासाठी पाच हजार रूपये आहे. तर, ज्या ठिकाणी दिग्गजांची अटीतटीची लढत आहे, तेथे हाच आकडा आठ हजार रूपये एका मतासाठी इतका आहे. विशेष म्हणजे, या वाटपासाठी सर्वत्र दोन हजाराच्या नव्या नोटांचा वापर होतो आहे.

िपपरी पालिकेच्या िरगणात अनेक उमेदवार कोटय़ाधीश आहेत. स्वत:च्या नावापुढे ‘नगरसेवक’ पदाची पाटी लावण्यासाठी ते आतुर आहेत. त्यामुळेच ‘िजकण्यासाठी काहीपण’ हेच सूत्र ठेवून पहिल्या दिवसांपासून ही मंडळी कामाला लागली आहेत. या प्रकारात मोडणारे उमेदवार हे प्रमुख पक्षांमध्ये विभागलेले आहेत. सुरूवातीला खर्चिक कार्यक्रम करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरले. प्रचारात विविध प्रलोभने तसेच भेटवस्तूंचा मारा सुरूच होता. हॉटेल, ढाब्यांवर जेवणावळी होत होत्या. फार्म हाऊसमध्ये दारूच्या पाटर्य़ा झडत होत्या. पैशांची ही उधळपट्टी इथपर्यंतच मर्यादित राहिली नाही. रविवारी जाहीर प्रचाराची सांगता झाली आणि मतदानपूर्व महत्वाचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवटच्या दीड दिवसात मतांचा खऱ्या अर्थाने बाजार मांडला गेला आहे. साधारणपणे मताला सरासरी दोन हजार रूपये भाव सगळीकडे आहे. मात्र, गुंठामंत्री, धनदांडगे तसेच दोन नंबरवाले उमेदवार ज्या ठिकाणी आहेत, तिथे मात्र मतदारांची भलतीच चंगळ झाली आहे. काही दिवसापूर्वीपर्यंत, चार जणांचे संपूर्ण पॅनेल मिळून एकत्रितपणे एका मतासाठी पाच हजार रूपये दिले जात होते.

रविवारी रात्री हाच आकडा सहा हजारापर्यंत गेला होता. वाकड, रावेतसारख्या प्रभागात एका मताला आठ हजार रूपयापर्यंत गेल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ज्या घरात पाच मतदार आहेत, त्यांना ५० हजार रूपये दिले जात होते. जे मतदार पैसे घेण्यास तयार नव्हते, त्यांच्या घरांमध्ये नोटांचे बंडल टाकून देण्यात येत होते. विशेष म्हणजे या सर्व वाटपामध्ये दोन हजाराच्या नव्या नोटांचा वापर करण्यात येत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उमेदवारांकडे नव्या नोटा कशा उपलब्ध झाल्या, अशी शंका मतदारांना येत होती. निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, भरारी पथक हे सगळे कागदावर (राहिले असून शहरभरात नोटांचे उघडउघड वाटप सुरू आहे.

पुण्यातही दोन ते पाच हजारांच्या ‘वाटाघाटी’!

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर विविध उमेदवारांकडून मतदारांना थेट पैशांची आमिषे दाखवून ‘वाटाघाटी’ला सुरूवात केली. रविवारपासून शहरात एका मतापोटी दोन ते पाच हजार रूपये भाव फुटल्याची चर्चा आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा योग घडवण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. कार्यकर्ते मतदारांची यादी घेऊन चाचपणी करत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनुकूल असलेल्या भागात मुसंडी मारून तेथून अधिकाधिक मते मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रत्येक मताला भाव फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील मध्यभागापेक्षा उपनगरातील मतदारांना जास्त भाव मिळत आहे. भवानी पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, कसबा पेठ तसेच पाषाण, वारजे माळवाडी, पौड रस्ता, येरवडा भागातील मतदारांना आमिषे दाखवण्यात येत आहेत. सोमवारी (२० फेब्रुवारी) रात्रीपर्यंत मताचा ‘भाव’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.