News Flash

भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून हाणामारी

उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

संग्रहित छायाचित्र

चिंचवडमधील घटनेत परस्परविरोधी तक्रारी; उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

पैसे वाटल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंमध्ये शनिवारी (१८ फेब्रुवारी) चिंचवड भागातील आनंदनगर वसाहतीत हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दंगल माजवणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आनंदनगर, भाटनगर प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपकडून शैलेश मोरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काळूराम पवार यांना उमेदवारी दिली आहे. शनिवारी रात्री चिंचवड भागातील आनंदनगर भागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे मोठय़ा संख्येने जमा झाले. बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम पवार, बाळू पवार, किरण तेलंग याच्यासह आणखी एकाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रक रणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लंगोटे (वय ३७) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

लंगोटे हे भाजपचे उमेदवार मोरे यांचे कार्यकर्ते आहेत. शनिवारी रात्री आनंदननगर भागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली. लंगोटे आणि त्यांचे मित्र तेथे गेले. तेव्हा काळूराम पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांंनी दांडक्याने मारहाण केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे लंगोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक मनीषा काळूराम पवार (वय ३४, रा.चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांच्यासह दहा ते पंधराजणांविरुद्ध दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदनगर वसाहतीत पवार यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. रात्री जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास मोरे आणि त्यांच्यासोबत असलेले दहा ते पंधरा कार्यकर्ते पवार यांच्या घराजवळ आले. पवार कोठे राहतात, अशी विचारणा करून त्यांनी घरावर दगडफेक केली.

परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांकडून मोरे आणि पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सोडनवर तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:28 am

Web Title: pmc elections 2017 bjp ncp
Next Stories
1 ‘गानसरस्वती’च्या मैफलीने रसिक तृप्त
2 सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना मानवंदना
3 एकाच मतदान यंत्रात दोन ‘बॅलेट’मुळे संभ्रमाची शक्यता
Just Now!
X