मोठय़ा रॅलीला पाच लाखांचा खर्च; माणशी पाचशे ते हजार रुपये आणि जेवणावळीही

पुणे पालिकेत दहा लाख, तर िपपरी- चिंचवड पालिकेत आठ लाख ही निवडणूक आयोगाने घालून दिलेली खर्चाची मर्यादा आहे. मात्र, प्रभागामध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रा व रॅलीसाठी माणशी पाचशे ते हजार रुपये देऊन रोजंदारीनेच माणसे आणली जात असल्याने काही उमेदवारांकडून रोजच्या एका पदयात्रेसाठीही लाखभर रुपये, तर मोठय़ा रॅलीसाठी चार ते पाच लाखांपर्यंतची रक्कम खर्च केली जात आहे. केवळ पदयात्रा व रॅलीचा हा ‘आडमार्गी’ खर्च धरला, तरीही बहुतांश उमेदवारांनी आयोगाच्या खर्चाची मर्यादा कधीच ओलांडल्याचे स्पष्ट आहे.

प्रभागामध्ये चिन्ह व उमेदवाराचे नाव पोहोचविण्यासाठी पदयात्रांवर मोठय़ा प्रमाणावर भर देण्यात येत आहे. पदयात्रेतील लोकांच्या सहभागाच्या संख्येवर संबंधित उमेदवाराची ‘हवा’ ओळखली जाते असा पक्का समज असल्याने पदयात्रेसाठी थेट रोख पैसे देऊन माणसे आणली जात आहेत. झोपडपट्टयांचा परिसर व उपनगरांमध्ये प्रामुख्याने महिलांना पदयात्रेत सहभागी करून घेतले जात आहे. त्यासाठी त्या-त्या भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत महिला बचत गटांशी संपर्क साधून पदयात्रेसाठी रोख रक्कम पुरविली जात आहे. प्रत्येक उमेदवाराकडून मागणी असल्याने पदयात्रेत सहभागी होण्याचा दरही वाढला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला एका पदयात्रेसाठी पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात आहे.

पदयात्रा प्रभावी होण्यासाठी कमीत कमी शंभर व्यक्तींचा तरी त्यात सहभाग असावा लागतो. प्रत्येकाला हातात पक्षाचा झेंडा, चिन्ह, उमेदवाराचा फलक आदी दिसणाऱ्या गोष्टी असतात. मात्र, सहभागी प्रत्येकाला रोख रक्कम आधिच द्यावी लागते. त्याचप्रमाणे संबंधितांची चहा-पाणी, नाष्टा त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे छोटय़ा पदयात्रांसाठीही लाखभराचा खर्च येतो, असे एका प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांने सांगितले. अशा पदयात्रा सध्या रोजच सुरू आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता सहाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभागातून वाहनांच्या सहभागात मोठी रॅली काढण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यासाठीही रोख रक्कम देऊन मोठय़ा प्रमाणावर माणसे आणण्याचे काम उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे.

रोख रक्कम देऊन हजारांहून अधिक माणसे रॅलीत सहभागी करून घेण्याचे काहींचे नियोजन आहे. अशा रॅलीसाठी चार ते पाच लाखांपर्यंत रक्कम खर्च केली जाणार आहे. कोपरा सभा, मोठय़ा नेत्यांच्या सभा यासाठीही अनेकांना अशाच पद्धतीने गर्दी जमवावी लागत असल्याने त्याचीही माणशी रक्कम पोहोचविली जात आहे. त्याचाही आडमार्गी खर्च लाखांच्या घरात केला जात आहे.

कार्यालयात फक्त चहापान; जेवणावळी दुसरीकडेच

उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयांमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, याकडे लक्ष दिले जाते. उपस्थित कार्यकर्त्यांना किंवा पदयात्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी या ठिकाणी चहापानाची किंवा जास्तीत जास्त नाष्टय़ाची व्यवस्था केली जाते. मात्र, रोजच्या जेवणावळी निराळ्याच ठिकाणी होतात. खास कार्यकर्त्यांची काही हॉटेलांमध्ये रोजची व्यवस्था केली जाते. त्यात ओल्या पार्टीचाही सहभाग असतो. एखादा छोटा हॉल किंवा खासगी जागेत नागरिक, कार्यकर्त्यांना जेवणावळी दिल्या जातात. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणावळी सध्या सुरू आहेत. त्यात बिर्याणीला सर्वाधिक मागणी असल्याचे कार्यकर्ते सांगतात.