समाजातील एक वर्ग नेहमीच अनेक सुविधांपासून दुर्लक्षित राहिला आहे. तो म्हणजे तृतीयपंथीय समाज आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली या उपेक्षित वर्गाला मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून त्यांना नव्याने जीवन जगण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यांना आपल्या समस्या मांडण्याची दिशा मिळाली असून २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात होत असलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदाच्या वर्षी तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ भागातील आशीर्वाद संस्थेच्या माध्यमातून रजिस्टर करण्यात आलेल्या ४० व्यक्तीनी आज झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले आहे.
या विषयी या संस्थेच्या अध्यक्षा बी.पन्ना म्हणाल्या की, समाजामध्ये हा वर्ग नेहमी सर्व सुविधांपासून वंचित राहिला आहे. २०१४ साली न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. यामुळे आमच्या सोडवण्यासाठी एक मार्ग सापडला असून आज जवळपास ४० व्यक्तींनी मतदान केले आहेत. या पुढील काळात देखील आमच्या परिसरात सर्व सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पुरविल्या गेल्या पाहिजे, अशी अपेक्षा असून येत्या काळात समाजातील सर्व व्यक्तींचे मतदार यादीमध्ये नोंदवले जाणार आहेत. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.