मेट्रोबाधित दुकानदारांसाठी पालिकेकडे जागाच नाही

पुणे : जेधे चौकातील (स्वारगेट परिसर) नियोजित बहुउद्देशीय वाहतूक केंद्राच्या कामांमुळे मित्रमंडळ चौकाजवळ तसेच अन्यत्र स्थलांतरित करण्यात आलेल्या स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम असून या स्टॉलधारकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठीचा जागेचा प्रश्न महापालिकेपुढे उभा राहिला आहे. पाटील प्लाझा समोरील पदपथांवर स्टॉलधारकांचे तात्पुरते स्थलांतर केल्यामुळे आधीच वाद ओढावलेल्या पालिकेला जागांअभावी हा तिढा सोडविणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

महामेट्रोच्या वतीने स्वारगेट येथे बहुउद्देशीय वाहतूक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्वारगेट परिसरातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत पाटील प्लाझासमोर असलेल्या पदपथावर स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र हे पुनर्वसन बेकायदा असून पाटील प्लाझामधील सभासद गाळेधारकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे, अशी तक्रार सभासदांकडून यापूर्वीच करण्यात आली आहे.

पाटील प्लाझा समोरच्या पदपथावर स्वारगेट परिसरातील स्टॉल्सचे करण्यात आलेले स्थलांतर बेकायदा आहे. हा रस्ता नो हॉकर्स झोन आहे. पदपथ केवळ पादचाऱ्यांसाठी असतानाही पदपथांवरच स्टॉल आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या स्टॉल्समुळे पाटील प्लाझामधील व्यवसायावरही परिणाम होत आहे, अशी तक्रार पाटील प्लाझा येथील गाळेधारक सभासदांकडून करण्यात आली होती. सध्या हे स्टॉल्स पदपथावर ठेवले आहेत. दरम्यान, हे स्थलांतर तात्पुरते आहे, असा दावा पालिकेडून करण्यात आला आहे. तर, पुनर्वसनासाठीचे स्टॉल्स महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात आले असून पुनर्वसनाचा निर्णय पालिकेला घ्यावा लागणार आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले.

‘स्वारगेट परिसरातील मेट्रोच्या कामांमुळे पाटील प्लाझा येथे स्टॉलधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे.

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागेचा शोध सुरू आहे,’ असे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. स्वारगेट येथे बहुउद्देशीय वाहतूक केंद्रांचे काम सुरू करण्यात आले आहे. या परिसरात पुन्हा स्टॉलधारकांचे पुनर्वसन होऊ शकणार नाही. पुनर्वसनाचा प्रश्न हा पालिकेचा आहे. महामेट्रोकडून स्टॉलधारकांना गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे महामेट्रोचे प्रकल्प अधिकारी अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

स्टॉलना विरोध

स्वारगेट परिसरातील स्टॉल सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानानजीक ठेवण्यात येणार होते. तेथे विरोध झाल्यामुळे मार्च महिन्यात संबंधित स्टॉल्स पाटील प्लाझा येथील पदपथावर आणण्यात आले. त्यासाठी पदपथांवर सिमेंट क्राँक्रिटचे काम करण्यात आले. नवी पेठ-पर्वती प्रभागामधील नगरसेवकांनीही या स्थलांतराला विरोध दर्शविला आहे.