25 February 2021

News Flash

सहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट

महापालिके कडून नोटिसा, नागरिकांचा तीव्र विरोध

(संग्रहित छायाचित्र)

महापालिके कडून नोटिसा, नागरिकांचा तीव्र विरोध

पुणे : डेक्कन जिमखाना- प्रभात रस्ता परिसरातील गल्लीबोळातील रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिके ने सहकारनगर-२ या भागातीलही रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याचा घाट घातला आहे.  स्वानंद, क्रांती, स्वातंत्र्यवीर सावरकर, सन्मित्र या परिसरातील रस्ते रुंदीकरणासंदर्भात महापालिके ने येथील बंगलेधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत. रस्ते रुंदीकरणाची कोणतीही आवश्यकता नसताना आणि मुळात अस्तित्वातील रस्ते सुस्थितीत असतानाही रस्ते रुंदीकरण कशाला, असा सवाल नागरिकांनी विचारला असून प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात नागरिक एकवटले आहेत.

सहकारनगर -२ भाग तळजाई टेकडी लगत आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात छोटय़ा-छोटय़ा जागा विकत घेऊन येथे नागरिकांनी एकमजली-दुमजली घरांची बांधणी के ली. त्यातून खासगी गृहनिर्माण संस्थांची स्थापनाही झाली.  या भागातील सोसायटय़ांच्या परिसरात बहुतांश बंगलेधारकांचे वास्तव्य आहे. येथील रस्तेही वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसे असून काही सोसायटय़ा किं वा बंगल्यांच्या पुढे जोड रस्ता (डेड एण्ड) नाही. मात्र महापालिके ने येथील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यासंदर्भात नागरिकांना नोटिसा बजाविल्या आहेत. स्वानंद, क्रांती, स्वातंत्र्यवीर सावरकर सोसायटी आणि सन्मित्र सोसायटी परिसरातील १५० हून अधिक बंगलेधारकांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

मुळातच या भागातील रहिवाशांना मिळकतीचा पुनर्विकास करायचा नाही. या परिसरातील अस्तित्वातील रस्तेही पुरेसे मोठे असून ते सुस्थितीत आहेत. मात्र त्यानंतरही काही बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठीच महापालिके ने या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट घातला असल्याचे आरोप यामुळे होत आहेत. या भागात रस्ते रुंदीकरण के ल्यास पर्यावरणाला बाधा पोहोचेल. मिळकतींचा पुनर्विकास करायचा नसल्यामुळे आम्हाला हस्तांरण विकास हक्क

( टीडीआर) किं वा चटई क्षेत्र निर्देशांकाची  एफएसआय) गरज नाही. अस्तित्वातील रस्तेही चांगले आणि मोठे आहेत. रस्ता रुंदीकरण झाल्यास अनेक मिळकतींना, बंगल्यांना बाधा पोहोचणार आहे, असे आक्षेप स्थानिक रहिवाशांनी महापालिके कडे नोंदविले आहेत. महापालिके ने डेक्कन जिमखाना-प्रभात रस्ता परिसरातील गल्लीबोळातील रस्ते रुंदीकरण करण्यासाठी नोटिसा बजाविल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ‘मुख्य रस्ते अरुंद,गल्लीबोळांवर घाला’ या शीर्षकाखाली दिले होते. त्यानंतर या भागातील नागरिकांनीही एकत्र येत त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर, रहिवाशांची सहमती नसेल तर रस्ता रुंदीकरण होणार नाही. तसेच इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आल्यास रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असे महापालिके कडून जाहीर करण्यात आले होते. मात्र बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी शहराच्या बहुतांश भागात महापालिके कडून असा प्रकार के ला जाण्याची शक्यता आहे.

खांबावर नोटिसा

सहकारनगर-२ भागातील रस्ता रुंदीकरणाची नोटीस महापालिके कडून एका खांबावर चिकटविण्यात आली होती. नोटीस दिल्याचे पुढे आल्यानंतर या भागातील नागरिकांनी नगरसेविका अश्विनी कदम यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरणाला विरोध असल्याचे निवेदन महापालिके ला नगरसेविका कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. या भागातील नागरिकांचाही रस्ता रुंदीकरणाला विरोध असल्यामुळे महापालिका काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रस्ता रुंदीकरणाला रहिवाशांचा विरोध आहे. हा भाग तळजाई टेकडीला लागून आहे. अनेक ठिकाणी जोड रस्ते नाहीत. मात्र रस्ता रूंदीकरणाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्याविरोधात महापालिके कडे वैयक्तिक आणि सोसायटीच्या स्तरावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

– नितीन पाटील, स्वातंत्रवीर सावरकर सोसायटी, कमिटी सदस्य

या भागात छोटे भूखंड आहेत. क्लस्टर करूनही त्यांचा विकास होऊ शकत नाही. रस्ते डोंगर पायथ्याकडे जाणार असून पुढे कोणताही जोड रस्ता नाही. त्यामुळे रुंदीकरणाला विरोध आहे. रस्त्यांवर वाहतूकही नाही. प्रत्येक वेळी विकसकाच्या बाजूने पाहणे योग्य नाही. या निर्णयामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होणार असून वृक्षराजी नष्ट होण्याची भीती आहे.

– अविनाश सुर्वे, सावरकर सोसायटी

प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे या भागातील रहिवाशांची घरे बाधित होणार असून यास रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. महापालिके ने बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी असा निर्णय घेऊ नये.

– अश्विनी कदम, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 1:08 am

Web Title: pmc issues notice to residents for road widening in sahakarnagar zws 70
Next Stories
1 बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब
2 इंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
3 जीएसटी तरतुदींविरोधात शुक्रवारी आंदोलन
Just Now!
X