महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या मानसिक छळ करणाऱ्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची वागणूक आणि या विषयातील प्रशासनाच्या बेपवाईबाबत सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी जोरदार टीका केली. या सर्वपक्षीय टीकेनंतर त्या अधिकाऱ्यांचा पदभार काढा, असा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिला.
महापालिकेतील उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी मानसिक छळ करीत असल्याची तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. या तक्रारीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी उमटले. मनसेच्या नगरसेविका आशा साने यांनी ही गंभीर बाब सभागृहाच्या निर्दशनास आणली. पालिकेत महिला कर्मचाऱ्यांनी कामे करायची नाहीत का, असा प्रश्न करून भाजपचे धनंजय जाधव म्हणाले की, संबंधित अधिकारी महिलांना फोनवरून अर्वाच्य भाषा वापरत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याला बडतर्फ करा. महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या अधिकाऱ्यावर पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या नगरसेविका अस्मिता िशदे यांनी दिला.
याच अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी तीन प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. मागील प्रकरणातही आयुक्तांनी त्याची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आयुक्तांकडून त्या अधिकाऱ्याची पाठराखण होत आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याला हा अधिकारी कचरा कंटेनरपाशी बारा तास उभे करून त्या महिलेचा छळ करत आहे. त्यामुळे आता तरी अधिकाऱ्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी विचारला.
प्रशासनात महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिली जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पंधरा दिवसात सर्वसाधारण सभेपुढे अहवाल ठेवण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. त्यावर हा अधिकारी पदावर असताना चौकशी करता येईल का, असा प्रश्न उपस्थित करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरिवद िशदे तसेच माजी महापौर कमल व्यवहारे यांनी केली. अखेर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पदभार मुक्त करा असा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिला.