भाजपमध्ये मोर्चेबांधणीला वेग; तीन दिवसांत नाव निश्चित होण्याची शक्यता

पुणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. महापौरपदासाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव भारतीय जनता पक्षाकडून निश्चित केले जाणार असून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांनाच संधी दिली जाईल, अशी शक्यता पक्षात वर्तविण्यात येत आहे.

‘‘विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ मार्च रोजी (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक शुक्रवारी (३ मार्च) जाहीर करण्यात येईल,’’ अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. एकहाती सत्ता आल्यामुळे महापौरपदासह इतर महत्त्वाची पदेही भाजपला मिळणार हेही स्पष्ट झाले. मात्र या पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षाकडून उमेदवाराचे नाव अधिकृतपणे अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. मुक्ता टिळक यांच्या बरोबरच आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर तसेच मानसी देशपांडे, वर्षां तापकीर, माधुरी सहस्रबुद्धे यांची नावेही या पदासाठी चर्चेत आहेत. महापौरपदासाठी महिला खुल्या गटाचे आरक्षण पडले आहे. पुढील अडीच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरसेविका मुक्ता टिळक यांच्याबरोबरच भाजप पुरस्कृत नगरसेविका रेश्मा भोसले यांचे नावही प्रारंभी चर्चेत होते. भोसले यांच्यासाठी पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे महापौरपदाची संधी नक्की कोणाला मिळणार, याबाबत तर्क-विर्तक सुरु झाले होते. मात्र खासदार काकडे यांनीही मुक्ता टिळक यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे टिळक यांचीच या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महापौर पदाची निवड ही केवळ औपचारिकताच असून या निवडीनंतर त्याच दिवशी उपमहापौर पदासाठीचीही निवडणूक होईल.

दोन दिवसांत भाजपची बैठक

महापौरपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्यानंतर शहर भाजपकडून सावध पवित्रा घेण्यात आला होता. यासंदर्भात प्रथम पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे प्रारंभी सांगण्यात येत होते. ‘‘महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता येत्या दोन दिवसांत पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असून बैठकीसाठी प्रभारी म्हणून मंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतरच पक्षाकडून महापौरपदासाठीचे नाव निश्चित करण्यात येईल,’’ अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.