शहरातील मिळकत धारकांना मिळकत कराच्या देयकांचे (बिल) वाटप महापालिकेतर्फे करण्यात येत असून नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी देखील मिळकत कर संकलन कार्यालये सुरू राहणार आहेत.
कर आकारणी व कर संकलन खात्याचे प्रशासकीय अधिकारी दिलीप भोईरकर यांनी ही माहिती दिली आहे. मिळकत कराच्या देयकांचे वाटप सुरू असल्यामुळे सध्या मोठय़ा प्रमाणात कर भरला जात असून नागरिकांच्या सोयीसाठी एप्रिल व मे महिन्यातील सर्व शनिवार व रविवारी महापालिकेची मिळकत कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. महापालिकेच्या मुख्य भवनात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि संपर्क कार्यालयांमध्ये कर स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व कार्यालये सुटीच्या दिवशीही सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. मिळकत कर वेळेत भरल्यास नागरिकांना सवलत दिली जाते. तसेच पर्जन्यजल संधारण, गांडूळ खत आणि सौर ऊर्जा हे प्रकल्प वा यातील एक वा दोन प्रकल्प ज्यांनी केले आहेत त्यांनाही सूट दिली जाते. कर स्वीकारण्यासाठी सुटीच्या दिवशी महापालिका कार्यालये सुरू ठेवली जाणार असल्यामुळे या सोयीचा फायदा मिळकत कर धारकांनी घ्यावा,असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.