महापालिकेचा प्रस्ताव

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीसाठय़ाचा विचार करून शहरात पाणीकपात केली जाणार आहे. शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला असून तो मान्यतेसाठी आयुक्तांपुढे ठेवण्यात आला आहे. पाणीसाठय़ाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता दिवसाआड पाणीपुरवठय़ाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असे चित्र आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात सद्य:स्थितीमध्ये सहा अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. त्यातील काही पाणी सिंचनासाठी द्यावे लागणार आहे. शहराच्या आसपासच्या गावांनाही याच साठय़ातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याशिवाय बाष्पीभवनाचा विचार करावा लागणार असून आषाढी वारीसाठीही पाणीसाठा राखीव ठेवावा लागणार आहे.  अशा परिस्थितीमध्ये शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करावी लागणार असून या सर्व बाबी लक्षात घेता पुण्यासाठी केवळ ४ अब्ज घनफूट पाणीसाठी उपलब्ध होणार आहे. या पाण्याच्या वाटपाचे नियोजन करावे लागणार असल्यामुळे पाणीकपातीशिवाय पर्याय नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. चार टीएमसी पाण्याचे पंधरा जुलैपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे पाणीकपातीशिवाय अन्य पर्याय नाही. पाणीपुरवठा विभागाने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मान्यतेसाठी आयुक्त सौरभ राव यांच्यापुढे ठेवण्यात आला आहे.

धरणातील पाणीसाठय़ाची परिस्थिती पाहता आयुक्तांकडूनही या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार असून त्या संदर्भात शनिवारी (४ मे) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून शहरात पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

शहरासाठी अवघे चार टीएमसी पाणी

ऑक्टोबरपासून शहरातील पाण्याचा विषय चर्चेत येण्यास सुरुवात झाली होती. जलसंपदा विभागाने महापालिकेला त्याबाबत सातत्याने इशाराही दिला होता. मात्र पाणीकपातीचा निर्णय घेतल्यास लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला वाटत होती. त्यामुळे पाणीकपात केली जाणार नसल्याचा दावा सातत्याने केला जात होता. पंधरा जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून पाणीपुरवठय़ात कपात होणार नसल्याचे सांगतानाच महापौर मुक्ता टिळक यांनी आठवडय़ातून एक वेळ पाणी बंद ठेवण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र आठवडय़ातून एक वेळ पाणीपुरवठा बंद ठेवून फारसा उपयोग होणार नाही. शहरासाठी पंधरा जुलैपर्यंत चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. महापालिकेचा सध्याचा वापर विचारात घेता महिन्याला सव्वा टीएमसी पाणी महापालिका घेते. त्यामुळे उपलब्ध साठय़ाचा विचार करता दिवसाआड पाणीपुरवठा हाच पर्याय असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.