पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ज्या ज्या जागांवर झोपटपट्टी झाली आहे, त्या झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन महापालिकेनेच करावे व अशा पुनर्वसनासाठी महापालिकेने धोरण तयार करावे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिकेतील आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांनी हा प्रस्ताव दिला असून महापालिकेच्या जागांवर ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी झाली आहे, त्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. महापालिका हद्दीत महापालिकेच्या जागेवर अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ा झाल्या आहेत. झोपटपट्टीवासीयांचे राहणीमान उंचवावे यासाठी राज्य शासनाने या झोपटपट्टीवासीयांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसन करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे व तशी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या जागेवर ज्या झोपडपट्टय़ा झाल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका मालक असलेल्या जागेवर झालेल्या झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे तसेच तसा ठरावही यापूर्वी महापालिकेने केलेला असल्यामुळे या प्रक्रियेसाठी महापालिकेने धोरण तयार करावे, असे डॉ. धेंडे यांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून महापालिकेने पुनर्वसनाबाबत धोरण तयार करावे व तसे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला सूचित करावे, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.