शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात असलेला अत्यंत अपुरा पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीबचतीसाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. पाणीकपात आणि पाणीबचत यासाठीचे धोरण तयार करण्यात आले असून यासंबंधीचा अंतिम निर्णय गुरुवारी (२६ जून) बोलावण्यात आलेल्या महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती आयुक्त विकास देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. धरणात सध्या किती पाणीसाठा उपलब्ध आहे, पाऊस होत नसल्यामुळे किती दिवसांसाठी पाण्याचे नियोजन करावे लागेल, उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस कसे पुरवता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणीकपात, पाणी पुरवून वापरणे आणि पाण्याचा गैरवापर टाळणे यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्यामुळे महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी सर्व पालिका पदाधिकारी आणि गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाणीकपात व अन्य बाबींसंबंधी निर्णय होणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
 सध्या रोज १२५० दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी घेतले जात आहे. धरणात सध्या १.९६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून गेल्यावर्षी या दिनांकाला धरणात ५.१३ टीएमसी इतका पाणीसाठा होता. तसेच त्या वेळी धरणात पाणी यायलाही सुरुवात झाली होती. यंदा मात्र पाणीसाठा सुरू झालेला नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. तसेच काटकसरीचे धोरण अवलंबावे लागणार आहे, असेही आयुक्त म्हणाले. शहरात सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी करून बांधकामांवर पिण्याचे पाणी वापरले जात असेल, तर अशा बांधकामांना तातडीने काम थांबवण्याची नोटीस देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच वॉशिंग सेंटर व अशाप्रकारे अन्य काही व्यवसायांच्या ठिकाणी पाण्याचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात कडक तपासणी सुरू करावी, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्या, असेही सांगण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.
पर्वती येथील प्रकल्पासाठी पाठपुरावा
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील नवा जलशुद्धीकरण प्रकल्प नेहरू योजनेत मंजूर झाला होता. मात्र केंद्रातील नव्या सरकारने या योजनेचा फेरआढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे पर्वती येथील प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त विकास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.