पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्यामुळे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली असून अद्यापही धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात पुन्हा पाणीसाठय़ाचा विचार करून आणखी पाणीकपात करायची वा कसे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात २८ जून पासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये त्या वेळी १.९३ टीएमसी इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा आता १.५१ टीएमसी इतका आहे. धरणक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पाणीकपातीपूर्वी शहरासाठी रोज १२५० दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. कपातीनंतर आता ११०० दशलक्ष लिटर रोज घेतले जात असून ते शहराला पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाण्याची गळती थांबवण्यासाठी देखील विविध उपाययोजना शहरात केल्या जात आहेत.
धरणक्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून कपातीबाबत फेरविचार करावा लागणार आहे. त्या दृष्टीने पुढच्या आठवडय़ात पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत पाणीसाठय़ाचा विचार करून शहरात रोज किती वेळ पाणी द्यायचे याचे नियोजन केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले.