प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले तर पुणे शहराला साडेसहा टीएमसी एवढा पाणीसाठा वाढवून मिळणार असल्यामुळे शेतीसाठी पाणी देण्याच्या प्रकल्पाचे काम महापालिकेतर्फे वेगाने सुरू असून विविध टप्प्यांमध्ये व विविध ठिकाणी सुरू असलेला हा प्रकल्प नोव्हेंबरअखेर पूर्ण केला जाणार आहे.
महापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेल्या करारानुसार पुणे शहराला वर्षांला साडेअकरा टीएमसी पाणी दिले जाते. त्यापैकी साडेसहा टीएमसी एवढे पाणी प्रक्रिया करून महापालिकेने सिंचनासाठी उपलब्ध करून दिले, तर तेवढा पाणीसाठा शहरासाठी वाढवून मिळणार आहे. पाणीसाठा वाढवून मिळवण्यासाठी महापालिकेने योजना तयार केली असून त्या अंतर्गत मुंढवा येथे जॅकवेल व पंपहाउस बांधून पाणी उचलण्याचा प्रकल्प उभा केला जात आहे. या प्रकल्पाची माहिती उपअभियंता (प्रकल्प विभाग) दिनकर गोजारे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. कार्यकारी अभियंता सुदेश कडू हेही या वेळी उपस्थित होते.
 जॅकवेलजवळच मुळा-मुठा नदीत पाणी अडवण्यासाठी १२० मीटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंढवा येथील जॅकवेलमध्ये दहा पंप बसवण्यात आले असून त्याद्वारे नदीतील पाणी उचलले जाईल. या जॅकवेलसाठी ३० कोटी रुपये खर्च आला आहे. नदीत येणारे हे पाणी विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधून प्रक्रिया करून आलेले असेल. हे पाणी जॅकवेलमधून साडेसतरानळी येथील मुठा उजव्या कालव्यापर्यंत नेले जाईल. त्यासाठी २७०० मिलिमीटर व्यासाची साडेतीन किलोमीटर लांबीची दाबनलिका टाकण्यात येत असून आतापर्यंत पावणेतीन किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा खर्च ५७ कोटी रुपये इतका आहे. ही नलिका पुणे-सोलापूर हा रेल्वेमार्ग ओलांडून न्यावी लागणार असल्यामुळे हे काम अवघड आहे. सध्या या ठिकाणी मोठा बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. रेल्वेमार्गाच्या खालून ही दाबनलिका नेण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला असून त्यानुसार हे काम सुरू असल्याचेही गोजारे यांनी सांगितले.
प्रक्रिया केलेले नदीतील पाणी जॅकवेलमध्ये घेतले जाईल व तेथून ते या दाबनलिकेतून साडेसतरानळी येथील मुठा उजवा बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाईल. साडेसहा टीएमसी पाणी या पद्धतीद्वारे सोडले जाणार असल्यामुळे तेवढे अतिरिक्त पाणी शहराला मिळणार आहे. शहरासाठी एकोणीस टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी आहे. या प्रकल्पामुळे वाढीव साठा मिळू शकेल, अशी माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.