महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडून कचरा वाहतुकीसाठी काढण्यात आलेली निविदा सदोष असून त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही होणार आहे. या निविदा प्रक्रियेची चौकशी करून ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी, असे पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
महापालिका हद्दीतून कचरा वाहतूक करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली होती. ही निविदा प्रक्रिया डिसेंबर २०१४ मध्ये घनकचरा विभागाने सुरू केली होती. पुढील प्रक्रिया व्हेईकल डेपोमार्फत राबवण्यात आली. या निविदेतील कामांप्रमाणे कामाची किंमत ६९ लाख ५३ हजार होत असून प्रत्यक्षात एक कोटी रुपयांपर्यंत काम करून घेण्यास सुरुवातीलाच मान्यता घेण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या निविदेतही अनेक त्रुटी असून त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा आक्षेप काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि नगरसेवक संजय बालगुडे यांनी घेतला आहे. तसे पत्रही त्यांनी गुरुवारी आयुक्तांना दिले.
कचरा वाहतुकीसाठी ठेकेदाराकडून जे डंपर घेण्यात येणार आहेत त्यांच्या कामाचे तास केव्हापासून मोजायचे या बाबत संबंधित निविदेत त्रुटी असल्याचे बालगुडे यांचे म्हणणे आहे. डंपर कामाच्या ठिकाणी पोहोचल्यापासून त्याचे तास मोजण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात गाडी कचरा उचलण्यासाठी रॅम्पवर पोहोचल्यानंतर ती भरण्यासाठी उशीर लावला जाणार व आठ तासांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे संबंधितांना जादा पैसे दिले जाणार, असे बालगुडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आठ तासांच्या कालावधीत डंपर किती खेपा करणार व किती अंतराच्या खेपा करणार याचाही उल्लेख निविदेत नाही. लांब अंतराच्या खेपांना ज्यादा इंधन लागणार असल्यामुळे लांब अंतराच्या खेपा ठेकेदाराची वाहने करणार नाहीत, याकडेही बालगुडे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे शहराबाहेर कचरा पाठवण्यासाठी ठेकेदाराच्या गाडय़ा उपलब्ध होणार नाहीत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
एखाद्या निविदेत जादा दर आल्यास खात्याकडून रेट अॅनॅलिसिस मागवले जाते. तसे या प्रकरणात मागवण्यात आले तर किती रकमेत ठेकेदार कोणते काम करणार आहे ते समजेल. या मुख्य बाबींसह संबंधित निविदेत अनेक त्रुटी असून निविदेची रक्कम मोठी असल्यामुळे तेवढे पैसे ठेकेदाराला देणे म्हणजे महापालिकेचे आर्थिक नुकसान आहे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशीही मागणी बालगुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.