पीएमपीच्या गाडय़ांना नैसर्गिक वायू पुरविल्याबद्दलची थकीत रक्कम तातडीने न दिल्यास इंधन पुरवठा थांबविण्याचा इशारा महाराष्ट्र नैसर्गिक वायू महामंडळाकडून ( एमएनजीएल )  देण्यात आला आहे. यामुळे शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीच्या अडचणीत वाढ  झाली असून पुणे आणि पिंपरी—चिंचवड महापालिकांनी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे.

टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेली पीएमपीची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी— चिंचवड शहरातील एकूण ४२१ मार्गांवर पीएमपीचे दैनंदिन संचलन सुरू आहे. पीएमपीला एमएनजीएलकडून नैसर्गिक इंधन ( सीएनजी) पुरविले जाते. त्यापोटी पीएमपी एमएनजीएलला ३८ कोटी रुपये देणे आहे.

टाळेबंदीमुळे एमएनजीएल आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे तातडीने थकबाकीची रक्कम द्यावी, अन्यथा इंधन पुरवठा थांबविण्यात येईल, असे पत्र एमएनजीएलने पीएमपीला दिले आहे.

दरम्यान, पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी—चिंचवड महापालिकांनी त्वरित निधी द्यावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

ही रक्कम मिळताच थकबाकीची रक्कम दिली जाईल. निधीसाठी महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

१८३ कोटी रुपयांची तूट

टाळेबंदीमुळे पीएमपीला १८३ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंतची ही तूट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन देखभाल दुरुस्ती खर्च वाढल्यामुळे ही रक्कम द्यावी, असे पत्र पीएमपीने दोन्ही महापालिकांना पाठविले आहे. पीएमपीची सेवा सुरू झाली असली तरी उत्पन्न सरासरी १८ लाखांपर्यंतच मिळत आहे. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेसाठी गाडय़ा पुरविल्याबद्दलची रक्कमही महापालिकांकडून पीएमपीला मिळालेली नाही.