पीएमपीकडून पर्यायी क्रमांकाची सुविधा

पुणे : मेट्रो मार्गिके च्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदाईचा फटका पीएमपीच्या दूरध्वनी सेवेला बसला आहे. खोदकामामुळे पीएमपीची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असून नागरिकांना पीएमपीकडील गाडय़ा आणि अन्य माहिती घेण्यात त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे पीएमपीने पर्यायी दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी भ्रमणध्वनी (मोबाइल) सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा चोवीस तास कार्यान्वित राहणार  आहे.

पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवासी सेवा दिली जाते. सध्याच्या करोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पीएमपीकडून ‘पुष्पक’ ही शववाहिनीची सेवाही पुरविली जात आहे. नागरिकांकडून पुष्पक शववाहिनी संदर्भात आणि अत्यावश्यक सेवेतील गाडय़ासंदर्भात ०२०-२४५०३२००, २४५०३२११, २४५०३२१२ या दूरध्वनी क्रमांकावरून माहिती घेतली जाते.

सध्या शहरात मेट्रो प्रकल्पाच्या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली आहे. त्याचा फटका पीएमपीच्या दूरध्वनी सेवेला बसला आहे. पीएमपीची बीएसएनएलची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे गाडय़ा आणि अन्य माहिती घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ही बाब विचारात घेऊन पीएमपीने स्वारगेट येथील मुख्यालयात पर्यायी दूरध्वनीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना ९९२१९६०९११ या भ्रमणध्वनी क्रमांकावर चोवीस तास संपर्क साधता येणार आहे.

तसेच दूरध्वनी क्रमांकही सुरू ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.