पीएमपी, एसटी स्थानकात चोरटय़ांचा सुळसुळाट

पीएमपी तसेच एसटी प्रवासात महिलांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम आहे. चोरटय़ांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासी महिलांकडील ४ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या.

याबाबत सहकारनगर भागातील रहिवासी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास तक्रारदार महिला स्वारगेट ते करमाळा या एसटी  बसमध्ये प्रवेश करत होत्या. नाताळाची सुटी असल्याने एसटी स्थानकात गर्दी होती. गर्दीतून बसमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने आणि ७ हजार ८०० रुपयांची रोकड असा ऐवज चोरटय़ाने लांबविला. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर महिलेने पिशवीची पाहणी केली, तेव्हा पिशवीतून ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक एम. एस. त्र्यंबके तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे- सातारा रस्त्यावरुन पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५२ हजारांची सोन्याची बांगडी चोरटय़ाने लांबविल्याची घटना घडली. याबाबत कोरेगाव पार्क भागातील  रहिवासी  ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला गेल्या आठवडय़ात  कात्रज ते लोहगाव या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. सातारा रस्त्यावरील थांब्यावरुन त्यांनी बसमध्ये प्रवेश केला. तेथून बस स्वारगेटकडे गेली. प्रवासात चोरटय़ाने ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५२ हजारांची सोन्याची बांगडी लांबविली. पोलीस हवालदार नाईक तपास करत आहेत.

पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घटना रोखणे तसेच चोरटय़ांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांना गर्दीच्या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शहरातील पीएमपी थांबे तसेच एसटी स्थानकाच्या परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील पीएमपी स्थानक तसेच एसटी स्थानकांच्या परिसरात चोरटय़ांचा सुळसुळाट झाला आहे. चोरटे मोकाट आहेत. चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.