नाना पेठेत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असणाऱ्या नेहरू रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने धडक दिल्याने तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या एका बाजूला वळवून वाहनांना धडकून थाबविल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे प्राण वाचले. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शी व हेल्प फाऊंडेशनचे यासीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस गुलटेकडीवरून लोहगावच्या दिशेने जात होती. रामोशी गेट चौक ओलांडून नेहरू रस्त्याने ही बस पुणे स्टेशनच्या दिशेने जात होती. रस्त्यात असलेल्या आईना हॉटेलच्या अलीकडेच बसचे ब्रेक निकामी झाले. या वेळी बसचा वेग अधिक होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहने व नागरिकांना बसची धडक बसण्याची शक्यता होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस डाव्या बाजूला हॉटेलच्या दिशेने वळवली. त्या वेळी एका मोटारीला बस घासली गेली व पुढे हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलींना बसची धडक बसली. पण, त्यामुळे बस थांबल्याने पुढील अनर्थ टळला.
मोटारसायकलींना दिलेल्या धडकेमुळे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कुणालाही गंभीर इजा झाली नाही. बस थांबल्याच्या जागेपासून काही अंतरावर विजेचा डीपी बॉक्स होता. सुदैवाने तिथपर्यंत बस पोहोचली नाही. अपघातानंतर घटनास्थळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. नागरिकांनी बस चालकाला खाली उतरविले. या घटनेत बस चालकाच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नागरिकांचीही समजूत काढून त्यांना शांत केले. बसमधील प्रवाशांनाही खाली उतरविण्यात आले. प्रवाशांपैकी कुणालाही इजा झाली नाही.