पुणे परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कार्यालयीन टपालातून हे पत्र मिळाले. याप्रकरणी मुंढे यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखसागर येथे राहणाऱ्या भुजंगराव मोहिते नावाच्या व्यक्तीने हे पत्र पाठवले असून पत्रामध्ये त्याने मुंढेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तुम्ही मनमानी कारभार करत आहात, तिकिट दर वाढवल्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. तुमचा मनमानी कारभार थांबवा, अन्यथा तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. धमकीप्रकरणी मुंढे म्हणाले की, दुपारी चार वाजता कार्यालयीन टपालातून हे पत्र मिळाले. पत्रातील मजकूर वाचल्यानंतर रितसर तक्रार नोंदवली आहे. आता पोलीस पुढील तपास करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिली.