शाळेतून पीएमपी बसने घरी निघालेल्या विद्यार्थिनींकडे असलेले पास चालत नसल्याचे कारण देत ताब्यात घेतलेले पास परत देण्यासाठी व बसमधून खाली उतरविण्यासाठी वाहकाने या विद्यार्थिनींना चक्का पाया पडण्यास भाग पाडल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या मुलींच्या पालकांनी व संतप्त नागरिकांनी पीएमपीच्या स्वारगेट व कोथरूड डेपोत येऊन गोंधळ घातला. त्यानंतर प्रशासनाने संबंधित बसचा वाहक व चालकावर कारवाईचे आश्वासन देऊन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
अ‍ॅग्लो ऊर्दू शाळेमध्ये सहावी व सातवीमध्ये शिकणाऱ्या सात विद्यार्थिनी शनिवारी पुलगेटवरून चुकून कोथरूडला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. बसच्या वाहकाने त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केल्यानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्याकडे असलेला पास दाखवला. मात्र, हा पास चालणार नाही, असे सांगत वाहकाने त्यांना तिकीट काढण्यास सांगितले. दोन विद्यार्थिनींनी लगेचच तिकीटही काढले. इतर विद्यार्थिनींकडे पैसे नसल्याने त्यांनी बसमधून खाली उतरवून देण्याची विनंती केली. पण, वाहकाने त्यांच्याशी हुज्जत घातली व त्यांचे पास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने तुम्हाला डेपोत साहेबांकडेच घेऊन जातो, असे सांगत भीती दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थिनींनी त्याला विनवणी केली. पास परत देण्यासाठी या वाहकाने विद्यार्थिनींनी पाया पडायला लावले. त्यानंतर पास देऊन काहींना नेहरू मेमोरियल हॉल, तर काहींना स्वारगेट येथे उतरविले.
विद्यार्थिनींकडून ही घटना समजल्यानंतर पालक व संतप्त नागरिकांनी कोथरूड डेपोत डेपो सुपरवायझर रज्जाक शिकलकर यांना घेराव घातला. शिकलकर यांनी या विद्यार्थिनींकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून वाहक व चालकांची माहिती मागविली. संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. याबाबत शिकलकर म्हणाले, मुलींनी बसचा क्रमांक घेतला नाही. मात्र, त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार सहा बसवरील वाहक व चालकांना बोलविण्यात आले आहे. मुलींकडून खात्री केल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.