18 November 2017

News Flash

पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी पंचसूत्रीचा अवलंब व्हावा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचे प्रश्न गंभीर झाले आहेत.

प्रतिनिधी, पुणे | Updated: May 20, 2017 3:34 AM

 

  • स्वयंसेवी संस्थांची मागणी
  • प्रवाशांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आज प्रवासी मेळावा

पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपीने स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, सक्षम आणि भरवशाची सेवा दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी केंद्रित नियोजन आणि प्रवासी हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कालबद्ध कृती कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यातच पीएमपीची दुरवस्था झाली आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे पीएमपीला शिस्त लावण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी कठोर निर्णय घेत आहेत. त्यातून सेवेतील सुधारणाही दिसून येत आहे. मात्र ‘खर्चात कपात’ या नावाखाली सुरु असलेल्या उपाययोनजांमुळे प्रवासी हितविरोधी निर्णयही होत आहेत. कमी प्रतिसादाच्या नावाखाली काही पासकेंद्र, शहरातील काही मार्ग-काही फे ऱ्या अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर सजग नागरिक मंच प्रणीत पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे आणि सतीश चितळे यांनी प्रवासी केंद्रित नियोजन आणि प्रवासी हिताचे निर्णय घेण्याची मागणी केली आहे. स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, सक्षम आणि भरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण झाल्यानंतरच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यासाठी प्रवासी मंचाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाच किलोमीटर अंतरसाठीची बस सेवा ही पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून द्यावी. शहरातील गर्दीच्या वेळी गर्दीच्या मार्गावर वारंवारिता दर पाच मिनिटाला असावी, मिनी, मिडी बस वापराव्यात, जड वाहने आणि मोठय़ा मोटारींना या मार्गावर टप्प्याटप्प्याने बंदी करावी, पारदर्शी प्रभावी, उत्तरदायी हेल्पलाईन व्यवस्था निर्माण करावी, हेल्पलाईन बसमध्ये ठळकपणे, दोन्ही दरवाज्याजवळ, पास केंद्र, थांबे येथे ही सुविधा द्यावी, तक्रारींची नोंद करून त्याचा क्रमांक कळवावा, तक्रारदाराला कालबद्ध माहिती द्यावी, डिजिटल, एलईडी स्थलदर्शक फलक किंवा पाटय़ा लावाव्यात, ठेकेदारांच्या गाडय़ांना डिजिटल फलकांची सक्ती करावी, सर्व प्रमुख थांब्यांवर बसबे, पट्टे आखावेत अशा काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. प्रवासी सहभाग प्रोत्साहन योजनाही सुरु करण्याची सूचना जुगल राठी, संजय शितोळे आणि सतीश चितळे यांनी केली आहे.

प्रवासी मेळाव्याचे आयोजन

प्रवाशांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी पीएमपी प्रवासी मंचाच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी प्रवासी मेळावा आयोजित करण्यात येतो. यावेळच्या मेळाव्यासाठी पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे हे उपस्थित राहणार आहेत. राजेंद्र नगर येथील म्हात्रे पुलाशेजारील इंद्रधनुष्य सभागृहात शनिवारी (२० मे) सायंकाळी पाच ते सात या कालावधीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्या दरम्यान प्रवाशांच्या अडचणींची सोडवणूक होण्यासाठी पीेमपीकडे मंचाकडून पाठपुरावाही करण्यात येतो. पीएमपीच्या हेल्पलाईनवर जास्तीत जास्त सूचना आणि तक्रारी नोंदविणाऱ्या पंचवीस सजग नागरिकांचा गौरव आणि प्रवासी मंचाकडून काही मोफत बस पासचेही वाटप करण्यात येणार आहे.

First Published on May 20, 2017 3:34 am

Web Title: pmpml empowerment issue