अपघात रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याचा आरोप

अपघात टाळण्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास पीएमपी प्रशासनाकडून निष्काळजीपणा करण्यात येत असल्यामुळे पीएमपीला कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. सजग नागरिक मंच प्रणीत पीएमपी प्रवासी मंचाकडून ही कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली असून नोटिशीनंतरही ठोस उपाययोजना न केल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रवासांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गाडय़ांना लोखंडी जाळ्या बसविणे पीएमपीला बंधनकारक आहे. या उपाययोजना करण्यासंदर्भात पीएमपी प्रवासी मंचाकडून गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र पीएमपीकडून तकलादू उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पीएमपीच्या प्राणांकित अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बसमध्ये चढताना एका विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर पीएमपीला उपाययोजना करण्यास निष्काळजीपणा होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ही कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांच्या वतीने ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

यासंदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले की, कायद्यानुसार पीएमपीला अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र तात्पुरत्या स्वरुपात पीएमपी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. उपाययोजना करण्यास निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्यामुळेच ही कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटिशीनंतरही ठोस उपाययोजना त्यांनी न केल्यास न्यायालयात जाण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.