16 February 2019

News Flash

प्रवाशांचा दोष काय?

गाडय़ांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांची आहे

(संग्रहित छायाचित्र)

‘पीएमपी’कडून प्रवाशांची सुरक्षिततचा, गाडय़ांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष

पुणे : संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा (इमर्जन्सी एक्झिट) नसल्यामुळे ठेकेदारांच्या गाडय़ांना योग्यता प्रमाणपत्र द्यायला प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) दोन वाहन निरीक्षकांनी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही पीएमपी आणि आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाकधपटशाहीने तीनशे गाडय़ांना प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या गाडय़ा चार दिवसांपासून रस्त्यावर धावत आहेत. ठेकेदाराचे हित जपण्यासाठी प्रवाशांची सुरक्षितता आणि गाडय़ांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार पीएमपीकडून सातत्याने होत आहेत.

मुंबई-बेंगळूरु बाह्य़वळण मार्गावर वारजे उड्डाणपुलानजीक पीएमपीची गाडी सेवा रस्त्याच्या पुलावरून ओढय़ात कोसळल्याची घटना सोमवारी घडली. या अपघातामध्ये पीएमपी चालक, वाहकासह सतरा जण जखमी झाले. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली, तरी पीएमपीच्या गाडय़ांच्या अपघातांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. स्टेअरिंग रॉडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी या अपघाताच्या निमित्ताने शहरात धावत असलेल्या ठेकेदाराच्या ‘त्या’ गाडय़ांची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबतची माहिती परिवहन विषयाचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे तीनशे गाडय़ांना संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा (इमर्जन्सी एक्झिट) नसल्यामुळे या गाडय़ा रस्त्यावर धावू शकणार नाहीत, असे सांगून आरटीओच्या दोन निरीक्षकांनी या गाडय़ांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन चालकाच्या

उजव्या बाजूला इमर्जन्सी एक्झिट असावी, असा नियम आहे. मात्र पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकार बाबासाहेब आजरी आणि ठाणे आरटीओचे जितेंद्र पाटील यांनी तत्काळ सीआयआरटीची बैठक बोलाविली. वास्तविक जितेंद्र पाटील आणि नयना गुंडे यांचा या बैठकीशी काहीही संबंध नव्हता. या बैठकीमध्ये या दोघा निरीक्षकांवर गाडय़ांना परवानगी देण्यात यावी, असा दबाव टाकण्यात आला. सीआयआरटीच्या सदस्यांनीही इमर्जन्सी एक्झिट नसल्यामुळे परवानगी देता येणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यानंतरही दबावाने या गाडय़ांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि २९ जूनपासून या गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. पीएमपीच्या अपघातग्रस्त गाडीचा आणि या प्रकरणाचा संबंध नसला तरी पीएमपी आणि आरटीओचा कारभार या प्रकारामुळे अधोरेखित झाला आहे.

प्रवाशांची सुरक्षितता आणि गाडय़ांची देखभाल या मूळ गोष्टीकडे पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच अपघात होत आहेत. वारजे उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातातील गाडी ठेकेदाराची आहे. ठेकेदारांकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र त्या करून घेण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत गाडय़ा मार्गावर पाठविण्यात येतात. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून यात प्रवाशांचा दोष काय, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

पीएमपीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी

प्रवाशांची सुरक्षितता आणि गाडय़ांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांची आहे.  त्यांच्याकडून दक्षता घेतली जात नाही. अपघात झाल्यानंतर ठेकेदाराला नोटीस बजाविली जाते. पण या प्रकाराला पीएमपीचे अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. देखभाल दुरुस्ती अभावी छोटय़ा-छोटय़ा कारणांमुळे अपघात होणार असतील तर पीएमपीच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी सजग नागरिक मंच प्रणीत पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली.

दादागिरी करून ठेकेदाराच्या गाडय़ांना पीएमपी आणि आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. यापूर्वी हडपसर आणि बिबवेवाडी येथे झालेल्या अपघातातही गाडय़ांना फिटनेस प्रमाणपत्र नसल्याची बाब उघडकीस आली होती. माहिती अधिकारातही त्याचा तपशील प्राप्त झाला होता. मात्र दबाव टाकून असे प्रकार होत असल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

– श्रीकांत कर्वे, परिवहन अभ्यासक

First Published on July 3, 2018 2:04 am

Web Title: pmpml ignore the maintenance and repair of bus