20 October 2019

News Flash

शहरबात : प्रवाशांबाबत पीएमपीची अनास्था

गाडय़ांच्या फेऱ्याही अचानक रद्द करण्यात येत आहेत. पीएमपीच्या अनेक थांब्याचीही दुरवस्था झाली आहे.

अविनाश कवठेकरपुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किमान दहा लाख प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या पीएमपी प्रवाशांबाबतची कमालीची अनास्था सातत्याने पुढे येत आहे. योग्य देखभाल दुरुस्तीअभावी गाडय़ा भर रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार घडत असतानाच वेगवेगळी कारणे पुढे करून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार पीएमपीकडून सुरू आहे. कधी गाडय़ांना चुकीचे डिजिटल फलक लागल्याचे सांगून तर कधी सीएनजी संपल्याचे कारण सांगून प्रवाशांना मध्येच उतरविले जात आहे. गाडय़ांच्या फेऱ्याही अचानक रद्द करण्यात येत आहेत. पीएमपीच्या अनेक थांब्याचीही दुरवस्था झाली आहे. अशा अनेक बाबी पीएमपीची प्रवाशांबाबतची अनास्था स्पष्ट करणाऱ्या आहेत.

पीएमपीच्या गाडय़ांनी पेट घेतल्याच्या काही घटना अलीकडे घडल्या आहेत. या प्रकारांमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि पीएमपीचा बेभरवशी कारभार हे मुद्दे सातत्याने पुढे आले. त्यावर टीकाही झाली. पीएमपीकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून खंतही व्यक्त करण्यात आली. पण पीएमपीचा बेभरवशी कारभार हा आता त्याहून पुढे गेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, सक्षम आणि भरवशाची सेवा पीएमपी प्रवाशांसाठी दूरच रहात आहेत. प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा द्यावी, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिवहन सेवांचे विलीनीकरण करण्यात आले. पण विलीनीकरणानंतरही पीएमपीची रडकथा कायम राहिली आहे. रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाडय़ा, चालक-वाहकांचे प्रवाशांबरोबर उद्धट आणि उर्मट वर्तन, सुट्टे भाग साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, केवळ खरेदीत रस दाखवून होत असलेली भरमसाठ उधळपट्टी, गाडय़ांची जादा दराने खरेदी या कारभारामुळे पीएमपीचा प्रवासी केंद्रित सेवेचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. नवीन कंपनी अस्तित्वात येऊनही कारभारत तसूभरही फरक पडलेला नाही. पीएमपीच्या दहा लाख प्रवाशांना या बेभरवशी कारभाराचा फटका बसत असतानाच आता तांत्रिक चुका आणि देखभाल दुरुस्तीकडे केलेल्या दुलक्र्षांचा फटकाही प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

पर्यावरणपूरक सेवा देण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या पंचवीस गाडय़ा घेण्यात आल्या. या गाडय़ा तंत्रज्ञानाने युक्त असल्याचा दावा करण्यात आला. डिजिटल बोर्ड, पॅनिक बटन, वातानुकूलीत यंत्रणा, आरामदायी आसन व्यवस्था असल्याचा दावा करण्यात आला. मात्र मध्यंतरी या ई-बसचा डिजिटल बोर्ड चुकीचा असल्याचे सांगून चालक-वाहकाने प्रवाशांना स्वारगेट येथे उतरविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सीएनजी म्हणजे नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या गाडय़ांमधील इंधन संपल्याचे सांगून प्रवाशांना खाली उतरविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र गाडीत इंधन आहे की नाही, किंवा गाडीचा डिजिटल बोर्ड योग्य आहे की नाही, अशा शुल्लक कारणांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणे ही पीएमपीसाठीची लाजिरवाणी गोष्ट आहे. गॅस कमी होता तर गाडी मार्गावर का आली, गाडी मार्गावर येण्यापूर्वी तिची तपासणी झाली नव्हती का, असे प्रश्नही यानिमित्ताने पुढे येत आहेत. एका बाजूला ही परिस्थिती असताना पीएमपीच्या दररोज किमान साडेपाच हजार फेऱ्या रद्द होत आहेत. देखभाल दुरुस्तीचा अभाव हेच त्याचे कारण असले तरी पीएमपीकडून मात्र त्याचे खापर मेट्रो प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि वाहतूक कोंडीवर फोडले जात आहे.

पीएमपीची सेवा प्रवासीकेंद्रित नाही, अशी तक्रार सातत्याने केली जाते. पीएमपी कारभातील अनेक बाबींवरून हे स्पष्ट झाले आहे. चुकीच्या पद्धतीने मार्गाची पुनर्रचना करणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता मार्ग बंद करणे, प्रवासी अधिक असलेल्या मार्गावर तुलनेने कमी गाडय़ा उपलब्ध करून देणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. पण आता पीएमपीचा कारभार किती ढासळला आहे, हेच या उदहारणांमधून स्पष्ट होत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पीएमपीच्या अशा ढिसाळ कारभारामुळेच प्रवाशांची संख्याही घटत आहे आणि खासगी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय प्रवाशांकडून वापरला जात आहे. त्यामुळे पीएमपीचे दैनंदिन उत्पन्नही कमी होत आहे. गाडय़ांच्या फेऱ्या रद्द होणे, प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धारिष्ट मात्र कोणी दाखवित नाहीत, हीच प्रवाशांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे.

प्रवासी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या पीएमपीच्या तक्रार निवारण कक्षाकडे मांडतात.

मात्र केवळ कगदोपत्रीच त्याची दाखल घेतली जाते, ही वस्तुस्थिती आहे. झाली तर जुजबीच कारवाई होते. अनेकदा प्रवासी गाडीत बसत असतानाच चालकाकडून गाडी पुढे दामटण्यात येते. त्यातून अपघात घडल्याचे प्रसंगही पुढे

आले आहेत. प्रवाशांचा जीवही चालक-वाहक धोक्यात घालत आहेत. गाडीत आग प्रतिबंधक उपाययोजना असाव्यात, यासाठी प्रवासी आणि स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पण आग प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाला करता आल्या नाहीत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात कारवाई करण्याचे सूचीत केल्यावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यासर्व प्रकारातून पीएमपीची प्रवाशांबाबत किती असंवेदनशीलता आहे, किती अनास्था आहे, हेच स्पष्ट होत आहे.

First Published on April 23, 2019 12:55 am

Web Title: pmpml indifference about commuters