पुणे : सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रमुख तीन मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा फोर्स मोटर्स या कंपनीने दिलेला प्रस्ताव टाळण्यासाठी पीएमपी भलत्याच ‘मार्गा’वर गेली आहे. हिंजवडी ते विमानतळ (मार्गे पुणे रेल्वे स्थानक) आणि पुणे दर्शन या मार्गावर फोर्स मोटर्सने सेवा सुरू करावी, असा अभिप्राय पीएमपीकडून देण्यात आला आहे. पीएमपीच्या या अभिप्रायामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासंदर्भात पीएमपी प्रशासन किती असंवेदनशील आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

पीएमपीची सेवा  सक्षम करण्याच्या दृष्टीने शहरातील तीन प्रमुख मार्गावर तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सेवा देण्याची तयारी फोर्स मोटर्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडून दर्शविण्यात आली होती. पीएमपीला सक्षम सेवा देता येत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर देण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार पीएमपी आणि महापालिकेला कोणतीही आर्थिक तोशीस लागणार नव्हती. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र तीन मार्गावर सेवेची परवानगी देणे म्हणजे पीएमपीचे खासगीकरण करण्यात येत आहे असा कांगावा सुरू झाल्यामुळे पीएमपी प्रशासनाची कोंडी झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही पीएमपीच्या मार्गाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत आंदोलने केली. त्यामुळे खासगी वाहतूक    कंपनीच्या प्रस्तावावर अभिप्राय देताना तो प्रस्ताव थेट नाकारण्याऐवजी भलतेच मार्ग प्रस्तावित करून पीएमपीने अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार

घेतला होता.  पीएमपीचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उद्योग समूहांनी उपाययोजना सुचवाव्यात आणि मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही  भाजपकडून करण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने पुढे येत हा प्रस्ताव दिला होता.

पीएमपीचा अभिप्राय

हिंजवडी ते विमानतळ या मार्गावर पुणे रेल्वे स्थानक मार्गे कंपनीने सेवा द्यावी. तसेच पुणे दर्शन मार्ग प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यास घ्यावा, असा अभिप्राय  पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कंपनीचा प्रस्ताव

पुणे स्टेशन ते कोथरूड, स्वारगेट ते कोथरूड आणि पुणे स्टेशन ते वडगांव शेरी या मार्गावर मिनी बस सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या मार्गावरील गाडय़ांच्या वारंवारितेचा कालावधी दर सात ते दहा मिनिटांचा असेल. गर्दीच्या वेळी किंवा आवश्यकता भासल्यास वारंवारिता वाढविण्यात येईल, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील प्रवाशांची गरज आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या हिताचा विचार करून पीएमपी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे. तसे निर्णय घेण्याचे पीएमपी प्रशासनाला अधिकार आहेत.

योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप