पीएमपीच्या स्थापनेपासूनचे सर्वाधिक उत्पन्न सोमवारी (२ मार्च) मिळाले. पीएमपीला एकाच दिवसात एक कोटी ८९ लाख ३४ हजार ६४० रुपये एवढे उत्पन्न मिळाले. दर सोमवारच्या उत्पन्नाचा विचार करता हे उत्पन्न चाळीस लाखांनी अधिक आहे.
पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना सुरू असून त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणल्या जात असल्यामुळेही उत्पन्न वाढत आहे. पीएमपीला यापूर्वी एकाच दिवसात एक कोटी ८४ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळाले होते. त्यापेक्षाही अधिक उत्पन्न २ मार्च रोजी मिळाले. सोमवार व गुरुवार वगळता पीएमपीचे सध्याचे दैनंदिन उत्पन्न सव्वा ते दीड कोटी रुपये एवढे आहे आणि दर सोमवारी आणि गुरुवारी ते एक कोटी ५० लाखांवर जाते. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्व आगार व्यवस्थापकांच्या बैठका तसेच चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन, विनातिकीट प्रवाशांची तपासणी आदी उपाय सुरू केले असून परिणामी उत्पन्न वाढत असल्याचे सांगण्यात आले.
पाच तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती
पीएमपी सेवेत कार्यक्षमता आणि प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने पाच निवृत्त व अनुभवी अधिकाऱ्यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील चार अधिकारी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत प्रदीर्घ काळ होते. परिवहन क्षेत्रातील अनुभवी व निवृत्त अधिकाऱ्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्याची कल्पना डॉ. श्रीकर परदेशी यांनी मांडली होती. पीएमपीच्या कामकाजात व सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे अधिकारी मार्गदर्शन करतील.
राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त अधिकारी पी. एम. पाठक, एस. एम. जाधव, एस. वाय. पवार, ई. एल. परब आणि राज्य शासनाच्या सेवेतील निवृत्त अधिकारी के. डी. मदने या पाचजणांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीच्या कामकाजात व्यावसायिक दृष्टिकोन आणणे, वेगवेगळ्या विभागांमध्ये योजना व धोरणे ठरवणे, उत्पन्न वाढ व खर्च कमी करण्यासाठी योजन आखणे आणि बेस्ट तसेच अन्य वाहतूक संस्थांमध्ये भेट देऊन तौलनिक अभ्यास करणे व उपाय सुचविणे अशा स्वरूपाचे काम पाच तज्ज्ञ सल्लागार पीएमपीसाठी करणार आहेत.